1.38 lakh voters have no address in the Zilla Parishad list : आरक्षण मर्यादा ओलांडली; फेरआरक्षणाची शक्यता
Khamgao : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. मात्र जिल्हा परिषदेसाठी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीत तब्बल १ लाख ३८ हजार ५४८ मतदारांचा निवासी पत्ता उपलब्ध नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतरच मतदार याद्यांतील गंभीर चुकांमुळे निवडणूक आयोगावर टीका झाली होती. त्याच यादीचा वापर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी होणार असल्याने ही त्रुटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मतदार यादीत अनेक मतदारांच्या नावासमोर (N.A.) अशी नोंद दिसत असून पत्ता न सापडल्याची स्पष्ट नोंद आहे.
या मोठ्या त्रुटीमुळे आगामी निवडणुकीत आरक्षणविषयक बदल व फेरआरक्षणाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्त्याविना असलेल्या मतदारांचे प्रमाण मोठे असल्याने अनेक मतदारसंघांचे गणित बदलू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
गावागावात एकच चर्चा – निवडणूक कार्यक्रम केव्हा?
ग्रामीण भागात सध्या शेकोट्यांजवळ, राजकीय कट्ट्यांवर “जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम नेमका केव्हा जाहीर होणार?” याचीच चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांनी गावोगावी जोरदार संपर्क मोहिमा राबवल्या होत्या; तर आरक्षणातील अनिश्चिततेमुळे ‘बेरीज-वजाबाकी’च्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले होते.
मात्र आता कार्यक्रम लांबणीवर पडत असल्याने ग्रामीण भागात राजकीय शांतता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक इच्छुकांनी दौरे, बैठका व छोटे मोठे कार्यक्रमही थांबवले आहेत.
निवडणूक आणखी लांबणीवर?
नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवल्याने जिल्हा परिषद निवडणूक आणखी काही दिवस पुढे ढकलली जाणार, असा राजकीय अंदाज व्यक्त होत आहे.
तूर्तास जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात कोणतीही ठोस प्रशासकीय हालचाल नसल्याने इच्छुक उमेदवार प्रतीक्षारत आहेत.








