Political circles paying attention how many seats Raj and Uddhav Thackeray demand : राज–उद्धव ठाकरेंकडे किती जागांची मागणी करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ठाकरे बंधूंशी जवळीक वाढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबई प्रदेशाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील युती, जागावाटप आणि निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा होणार आहे.
ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असून, मुंबई प्रदेशाध्यक्ष राखी जाधव यांच्याकडून पक्षाची अधिकृत भूमिका आणि जागावाटपाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. येत्या रविवारी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार असल्याने, त्याआधी होणारी ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे. या बैठकीत मुंबईत राष्ट्रवादीने किती जागांवर दावा करावा, तसेच कोणत्या पक्षासोबत आघाडी करावी, यावर अंतिम मत ठरवले जाणार आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : नव्या पदाधिकाऱ्यांच्या हाती निवडणुकीची दोरी!
पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सध्या 22 जागांचा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, पक्षातील अनेक नेत्यांचे मत आहे की, मुंबईत किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून येऊ शकतील इतकी ताकद पक्षाकडे आहे. त्यामुळे जागांची मागणी वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही नेत्यांकडून तर थेट 40 ते 50 जागांची मागणी करावी, अशी भूमिका मांडली जात असल्याचेही समजते. तथापि, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कमी जागा लढवून अधिक स्ट्राइक रेट राखण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे पक्षातील जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, बुधवारी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई पातळीवर बैठक घेऊन स्थानिक नेत्यांचा कल जाणून घेतला होता. या बैठकीत बहुतांश नेत्यांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्टपणे मांडली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या आणखी एका बैठकीतही कार्यकर्त्यांनी ठाकरे बंधूंशी युती करण्याची जोरदार मागणी केली होती. मुंबई युथ विंगचे अध्यक्ष अमोल मातेले यांनीही याबाबत सांगताना, काँग्रेसकडून युतीबाबत विचारणा सुरू असली तरी, पक्षातील एकूण कल हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याकडेच असल्याचे स्पष्ट केले आहे.
2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 9 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात विशेषतः मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद काही प्रमाणात वाढल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे.
Ravi Rana : मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् विकासाच्या १२ मुद्द्यांना गती!
आजच्या बैठकीत संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्न, संभाव्य उमेदवार, तसेच ठाकरे बंधूंशी होणाऱ्या युतीचे स्वरूप यावर सखोल चर्चा होणार आहे. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी नेमकी किती जागांची मागणी केली जाणार, याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. एक ते दोन दिवसांत यासंदर्भातील अंतिम चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता वर्तवली जात असून, मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष सध्या याच निर्णयाकडे लागले आहे.








