Ajit Pawar : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही; महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली

Gangs of robbers increased, Ajit Pawars strong crackdown in Pimpri : लुटारूंच्या टोळ्या वाढल्या, अजित पवारांची पिंपरीत जोरदार फटकेबाजी

Pimpri-Chinchwad : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करत शहरातील भाजप सत्ताकाळातील कारभारावर गंभीर आरोपांची झोड उठवली. भाजपच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली गेली असून, शहर कर्जबाजारी झाले आहे. भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही, अशा तीव्र शब्दांत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला.

अजित पवार म्हणाले की, फेब्रुवारी २०२५ मध्ये महापालिकेची निवडणूक व्हायला हवी होती. १९९२ पासून आपण पिंपरी-चिंचवड शहरात सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करत आलो. १९९२ ते २०१७ या कालावधीत शहराचा कायापालट केला, मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. मात्र २०१७ मध्ये मोदी लाट आली आणि अनेक जण बाजूला गेले. त्या काळात विठ्ठल मूर्ती घोटाळ्याचे आरोप झाले, पण ज्या महापौरांच्या काळात हा कथित घोटाळा झाला, तेच आज भाजपमध्ये गेले आहेत, असा टोला अजित पवारांनी लगावला. यावेळी त्यांनी शरद पवारांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासाला कशी गती दिली, याचाही उल्लेख करत पवार साहेबांचे कौतुक केले.

Akola Municipal Corporation Election : भाजपमध्ये निलंबितांचा पुनर्प्रवेश; शिवसेना ठाकरे गटालाही धक्का

भाजपच्या सत्ताकाळातील आर्थिक कारभारावर टीका करताना अजित पवार म्हणाले की, २०१७ पूर्वी पिंपरी महापालिकेच्या ठेवी ४८४४ कोटी रुपयांच्या होत्या. आज त्या थेट २००० कोटींवर आल्या आहेत. वास्तविक या ठेवी वाढायला हव्या होत्या. उलट कर्जरोखे काढून कोट्यवधींचे कर्ज घेतले गेले. एवढा पैसा खर्च केला असेल तर विकासकामे कुठे दिसतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या काळात टेंडरमध्ये रिंग करून पैसे लाटले गेले, रस्ते अरुंद केल्यामुळे शहरात भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली, आमच्या काळात मात्र शहरात सुसाट प्रवास होत होता, असा दावा त्यांनी केला.

भ्रष्टाचाराच्या आरोपांना अधिक धार देताना अजित पवार म्हणाले की, अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावली गेली. अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढले असून तिथे हफ्तेखोरी सुरू आहे. गेल्या नऊ वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात असाच विकास झाला आहे. टेंडरमध्ये रिंग, दादागिरी सुरू आहे. यासंदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत, पुराव्यांशिवाय मी बोलणार नाही आणि बिनबुडाचे आरोप करणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

Kirit Somaia : कट्टर शत्रू असलेल्या किरीट सोमय्या यांच्या मुलाविरुद्ध ठाकरेंना एक उमेदवार मिळेना

महापालिकेच्या कर्जबाजारी स्थितीवर बोलताना अजित पवारांनी भाजपच्या स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले. काही लोकांच्या प्रॉपर्टी अचानक कशा वाढल्या, हा पैसा कुठून आला, असा थेट सवाल त्यांनी केला. सत्तेची मस्ती, माज आणि नशा आली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्ले गेले, कशात पण पैसे खाल्ले, अशा शब्दांत त्यांनी महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. आमच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

भाजपच्या २०१७ ते २०२२ च्या सत्ताकाळात स्थायी समितीचे अध्यक्ष असताना नितीन लांडगे यांना अटक झाल्याची आठवण करून देत अजित पवार म्हणाले की, महापालिकेच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. आज पिंपरी-चिंचवडमध्ये खोदाई माफिया फोफावले आहेत. आधी लँड माफिया, भंगार माफिया होते, आता खोदाई माफिया वाढले आहेत. जिओ, एअरटेल, व्होडाफोनसारख्या कंपन्या शहरात राजरोसपणे खड्डे खणत आहेत. शहरात लुटारूंच्या टोळ्या दिवसाढवळ्या वावरत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

Amravati Municipal Corporation Election : उमेदवारी अर्जाच्या वैद्यतेवरून 13 तास रंगले नाट्य

अजित पवार यांनी आणखी एक धक्कादायक आरोप करत सांगितले की, बिनविरोध निवडणुकीसाठी उमेदवारांचा सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला. एका उमेदवाराला पाठलाग करून पकडले, गाडीत बसवले आणि त्याचा अर्ज मागे घ्यायला लावला, असा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला.

एकूणच पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या सत्ताकाळावर अजित पवारांनी जोरदार टीका करत भ्रष्टाचार, कर्जबाजारीपणा, माफियागिरी आणि सत्तेच्या मस्तीचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्लाबोल अधिकच तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

___