A phased plan to destroy Mumbai is underway – Raj Thackeray’s allegation : मुंबई तोडण्याचा टप्प्याटप्प्याने डाव सुरू आहे – राज ठाकरेंचा आरोप
Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा दुसरा भाग शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या मुलाखतीत सत्ताधारी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच मुंबईच्या भवितव्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण करणारी ठरली आहे.
मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी मुंबईतील संपत्ती, जमीन आणि आर्थिक सत्तेचा मुद्दा उपस्थित केला. मुंबईची लक्ष्मी मराठी माणसाच्या हातात राहिलेली नाही. मराठी माणूस कामगार, श्रमिक आणि लढवय्या होता, मात्र आज तो शहराबाहेर ढकलला जात असून संपत्ती एका विशिष्ट वर्गाच्या हातात केंद्रीत होत आहे. ही संपत्ती सातत्याने गुजरातकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवल्यानंतर राज ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली. मुंबई विमानतळ पूर्ण क्षमतेने नवी मुंबईत हलवून सध्याच्या डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागा अदानी समूहाच्या मालकीच्या असल्याने त्या पुन्हा विक्रीसाठी काढण्याचे नियोजन असल्याचा गंभीर दावा राज ठाकरे यांनी केला. हा विषय केवळ आर्थिक नाही तर मुंबईच्या अस्तित्वाशी जोडलेला असल्याचे ते म्हणाले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, त्या काळातही मुंबई गुजरातला द्यावी अशी मागणी करणारे मुंबईतील अमराठी धनदांडगे होते. आज परिस्थिती वेगळी नाही, फक्त मागणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तेव्हा पाच लोक अशी मागणी करत होते, आज ती संख्या पाचशेपर्यंत गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या प्रकारे निर्णय घेतले जात आहेत, त्यातून मुंबई टप्प्याटप्प्याने तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा धोका पूर्वी कधीच इतक्या प्रमाणात नव्हता, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या घडामोडींची उदाहरणे देताना राज ठाकरे यांनी वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि सध्याच्या मुंबई विमानतळाच्या भवितव्याचा उल्लेख केला. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईतील कार्गो वाहतूक तिकडे वळवली जाणार असून पुढे डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणेही नवी मुंबईत हलवली जातील. सध्याच्या मुंबई विमानतळाची जागा अत्यंत मोलाची असून त्या परिसरात किमान पन्नास शिवाजी पार्क मैदानं मावू शकतील, असे सांगत ही जमीन पुन्हा विक्रीसाठी काढण्याचे नियोजन असल्याचा आरोप त्यांनी केला.
आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ राज ठाकरे यांनी देशातील दोन प्रमुख उद्योगपती घराणी, अदानी आणि अंबानी, यांच्यातील फरक स्पष्ट केला. उद्योग करताना सगळेच काही प्रमाणात गैरमार्ग वापरतात, मात्र अंबानी हे मोदी मोठे होण्याच्या आधीपासून मोठे उद्योगपती होते, तर अदानी हे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरच मोठे झाले, असा दावा त्यांनी केला. मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर अदानींना मुंद्रा पोर्ट मिळाला आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानी समूहाचा विस्तार झपाट्याने झाला, असे राज ठाकरे म्हणाले.
याचवेळी भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारण्यात आल्याचाही मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांना दुय्यम स्थान देण्यात आले असून आज भाजपातील अनेक नेते गप्प आहेत, कारण त्यांच्या हातात काहीच उरलेले नाही, असा आरोप त्यांनी केला. वरून बसवलेल्या माणसांकडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या जात असून हे चित्र काँग्रेसच्या काळात जे होते, त्याच्याशी साधर्म्य राखणारे आहे, असे ते म्हणाले.
मोदी-शाह यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांचे मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशावर विशेष लक्ष असून गेल्या पन्नास ते साठ वर्षांत जे कधी घडले नाही, ते आता घडत असल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी ही मुलाखत संपवली.








