Infrastructure Marvel : भूसंपादन पूर्ण, ५० वर्षांची प्रतीक्षा संपली अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यासाठी ‘भाग्यरेषा’!

New Akola–Khandwa rail line to connect North and South India : अकोला-खंडवा रेल्वेमार्ग ठरणार उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा महामार्ग

Buldhana/Akola गेल्या पाच दशकांपासून केवळ कागदावरच रखडलेला अकोला-खंडवा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता सत्यात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. पर्यावरणाचे कडक निकष, कायदेशीर पेच आणि राजकीय इच्छाशक्तीच्या कसोटीवर हा प्रकल्प अखेर यशस्वी ठरताना दिसत आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील १३ गावांमधील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याने या मार्गाच्या कामाला आता ‘बुलेट’ गती मिळाली आहे. हा रेल्वेमार्ग केवळ दळणवळणाचे साधन नसून, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम पट्ट्यासाठी विकासाचे नवे दालन उघडणारा ‘गेमचेंजर’ प्रकल्प ठरणार आहे.

या प्रकल्पाचा मूळ मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने वन्यजीव संवर्धनासाठी तो अडथळा ठरत होता. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयातून यावर तोडगा काढला. आता हा मार्ग अडगाव – हिवरखेड – सोनाळा – जामोद – उसरणी – खिकरी मार्गे तुकाईथड असा वळवण्यात आला आहे. जरी या पर्यायी मार्गामुळे लांबी २९ किमीने वाढली असली, तरी यामुळे मेळघाटच्या निसर्गसंपदेला धक्का न लागता विकासाचे चाक पुढे सरकले आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे वन्यजीव आणि विकास यांत सुवर्णमध्य साधला गेल्याचे सकारात्मक विश्लेषण तज्ज्ञांकडून केले जात आहे.

Khamgao Municipal Council : खामगाव पालिकेत भाजपचा दबदबा; चारही जागांवर भाजपचाच शिक्का

या प्रकल्पाच्या यशस्वीतेत जिल्हा प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी ३१४ अपीलांची प्रकरणे केवळ नऊ महिन्यांत निकाली काढली. जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील १८६ हेक्टर जमीन अधिग्रहित करून ३५५ शेतकऱ्यांना सुमारे १८९ कोटी ११ लाख रुपयांचा मोबदला थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, भूसंपादनासाठी लागणारा विलंब आता कामाच्या वेगासाठी कारणीभूत ठरणार आहे.

केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारने या प्रकल्पाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा रेल्वेमार्ग मालवाहतूक आणि प्रवासी सेवा या दोन्ही दृष्टीने ‘रणनीतिक दुवा’ ठरेल. विशेषतः उत्तर भारतातील मराठी भाषकांना तीर्थक्षेत्र शेगावपर्यंत पोहोचणे आता सोपे होणार आहे. सोनाळा आणि जामोद येथे प्रस्तावित स्थानकांमुळे स्थानिक बाजारपेठांना बळ मिळेलच, शिवाय कृषीमालाच्या निर्यातीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. यामुळे विदर्भ आणि मध्य प्रदेशातील व्यापाराला नवी झळाळी मिळणार आहे.

Education Policy : “२५ वर्षे सेवा केली, आता परीक्षा द्यायची का?” बुलढाण्यात शिक्षकांचा संताप

मध्य प्रदेशच्या सीमेवर कुवरदेवजवळ साढे सहा किलोमीटर लांबीचा महाकाय बोगदा तयार करण्याचे मोठे आव्हान रेल्वेसमोर आहे. भूशास्त्रीय दृष्ट्या हा टप्पा कठीण असला, तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सिकंदराबाद निर्माण विभाग हे काम वेळेत पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील ५० हून अधिक गावांतील ३.९ लाख लोकसंख्येला रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. आदिवासी पट्ट्यातील हा ऐतिहासिक कायापालट महाराष्ट्राच्या विकासाच्या नकाशावर एक नवी मोहोर उमटवणारा ठरेल.