Political movements, intense tussle for positions in BJP Shinde Sena : राजकीय हालचाली, भाजप – शिंदेसेनेत पदावरून जोरदार रस्सीखेच
Mumbai : महानगरपालिकेच्या महापौर पदावरून सध्या महायुतीतच घमासान सुरू आहे. किंगमेकर ठरलेल्या शिंदेसेना आणि संख्याबळाने मोठ्या असलेल्या भाजपमध्ये महापौर पद कोणाच्या पारड्यात जाणार, यावरून जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर निवडीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली असून निवडीचा संभाव्य कालावधी निश्चित झाला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकणाऱ्या नगरसेवकांसाठी 20 जानेवारी रोजी गॅझेट नोटिफिकेशन जारी होणार आहे. त्यानंतर 21 आणि 22 जानेवारी रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे गट म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. महापौर पदासाठीचे आरक्षण 22 जानेवारी रोजी लॉटरी पद्धतीने जाहीर होणार असून त्यानंतर 31 जानेवारी रोजी महापौर निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर कोणाचा होणार याचा राजकीय निर्णय मात्र त्याआधीच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
PMC Mayor Race : पुणे महापौरपदासाठी ‘ओबीसी पुरुष’ आरक्षणाची दाट शक्यता; भाजपमध्ये हालचालींना वेग!
महापौर पदावर दावा सांगणाऱ्या शिंदेसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे मुंबईचा महापौर शिवसेनेचाच असावा, अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे भाजपकडून मित्रपक्षाला हे महत्त्वाचे पद देण्यास अंतर्गत विरोध होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच महायुतीत असतानाही या पदावरून तणाव निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र महापौर पदावर कोणताही वाद नसल्याचा दावा करत महायुतीचाच महापौर होईल, असे स्पष्ट केले आहे. तरीही विरोधकांकडून नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून टोलेबाजी सुरू आहे. मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर असून ते राज्यात परतल्यानंतर महापौर पदाबाबत उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. याच अनुषंगाने एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Mumbai BMC elections : मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपला; ‘अडीच-अडीच’ वर्षांवर शिक्कामोर्तब!
दरम्यान शिंदेसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा होणार आहे. बीएमसी निकालानंतर ही चर्चेची पहिली फेरी ठरणार असून या बैठकीला शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि शिंदेसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. राज्यात कोणतीही नवीन युती करण्याचा प्रस्ताव नसल्याचेही शिंदे गोटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापौर पदावर अंतिम शिक्कामोर्तब मुख्यमंत्री दावोसहून परतल्यानंतर होण्याची शक्यता असून, मुंबईच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
__








