
ajit-pawar-asthi-kalash-darshan-begins-today-in-buldhana : आजपासून सुरुवात; ५ फेब्रुवारीला खडकपूर्णा प्रकल्पात होणार विसर्जन
Buldhana महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे नेते लोकनेते अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्यासाठी आज, मंगळवार ३ फेब्रुवारीपासून बुलढाणा जिल्ह्यात अस्थिकलश दर्शन प्रवासाला प्रारंभ होत आहे. आज सकाळी सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थान परिसरातून या प्रवासाची सुरुवात होणार असून, पुढील तीन दिवस जिल्ह्याच्या विविध भागांत हा कलश नेला जाईल. आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुलढाणेकर सज्ज झाले आहेत.
आमदार मनोज कायंदे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले असून, आज पहिल्या दिवशी सिंदखेड राजा, लोणार, मेहकर आणि खामगावमार्गे हा अस्थिकलश शेगाव येथे पोहोचेल. रात्री शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्काम असेल. उद्या, ४ फेब्रुवारी रोजी हा कलश जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा आणि बुलढाणा शहरात दाखल होईल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ठराविक चौकांमध्ये नागरिकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, जिथे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते दादांना श्रद्धांजली अर्पण करतील.
Pune land scam : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल
अजितदादांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेली असताना, त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी भावना दाटून आली आहे. ५ फेब्रुवारी रोजी या प्रवासाचा समारोप होईल. त्या दिवशी चिखली आणि देऊळगाव राजा येथे दर्शन झाल्यानंतर दुपारी ३.०० वाजता संत चोखामेळा सागर (खडकपूर्णा) प्रकल्प येथे विधीवत पूजन करून या पवित्र अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासात आणि सहकार क्षेत्रात दादांचे असलेले योगदान पाहता, या तीन दिवसांत जिल्ह्यात मोठा जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता आहे.








