cyber-crime-case-registered-against-nitin-gadkari-defamation : आक्षेपार्ह ‘रिल्स’ प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; गुन्हे शाखेचे विशेष पथक तैनात
Nagpur केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्या एका अज्ञात इंस्टाग्राम हँडलरच्या विरोधात नागपूर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्रामवर एकूण तीन विविध ‘रिल्स’ प्रसारित करण्यात आल्या आहेत. या रिल्सच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या प्रतिमेला तडा जाईल अशा स्वरूपाचा आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ शेअर करून त्यांची बदनामी करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
Nagpur municipal corporation : नागपुरात खऱ्या अर्थाने ‘महिला राज’! १० मिनी महापौरही महिलाच होणार
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, केवळ सायबर पोलीसच नव्हे तर नागपूर शहराचे पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि गुन्हे शाखेचे पथकही कामाला लागले आहे.
सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हे ‘रिल्स’ नेमके कोणी तयार केले आणि कोणत्या हँडलवरून ते सर्वप्रथम प्रसारित झाले, याचा तांत्रिक तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बदनामीकारक कृत्यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या मदतीने समांतर तपास सुरू करण्यात आला आहे.
Mumbai climate week : ‘मुंबई क्लायमेट वीक’ म्हणजे केवळ दिखावा; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्ला
सोशल मीडियाचा वापर करून लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. येत्या काही दिवसांत या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.








