hotels-restaurents-not-in-priority-owners-question-for-lpg-shortage : व्यावसायिकांचा सवाल; गॅस टंचाईमुळे निदर्शने, पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
Akola अकोला जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, केटरिंग, विद्यार्थी मेस तसेच वाईन बारसाठी लागणाऱ्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा मागील आठ ते दहा दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाल्याने व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत समस्येच्या तात्काळ निराकरणाची मागणी केली.
यावेळी व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. लवकरात लवकर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने केटरिंग व्यवसायिकांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. अनेकांनी लग्न समारंभासाठी जेवणाच्या ऑर्डर्स स्वीकारल्या असताना गॅसअभावी सेवा देणे कठीण होत आहे. तसेच शहरातील बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्नही मेस चालकांसमोर निर्माण झाला आहे.
Religion conversion bill : गुजरातचा अजेंडा महाराष्ट्रात? धर्मांतर बंदी विधेयकावरून नव्या वादाला तोंड
हॉटेल, रेस्टॉरंट आणि वाईन बारमधील कर्मचाऱ्यांच्या अन्नपुरवठ्यावरही या परिस्थितीचा परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, १३ मार्च २०२६ रोजीच्या शासन परिपत्रकात हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, मेस आणि वाईन बार यांचा प्राधान्य क्षेत्रात समावेश नसल्याने गॅस मिळण्याची शक्यता कमी झाल्याची खंत व्यवसायिकांनी व्यक्त केली.
या सेवा बंद पडल्यास त्याचा परिणाम केवळ व्यवसायिकांपुरता मर्यादित न राहता शेतकरी, भाजी विक्रेते, किरकोळ व्यावसायिक, कारागीर आणि कामगारांवरही होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शासनाने तातडीने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.
Maharashtra Assembly : शिक्षण संस्थांची फी, गिग वर्कर्सची सुरक्षा अन् नागरी सुविधांची दुरवस्था
यावेळी अकोला हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, वाईन बार संघटनेचे अध्यक्ष अतुल पवनीकर यांच्यासह अनेक व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, समस्या तातडीने न सुटल्यास हॉटेल व्यवसायिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.








