maharashtra-board-ssc-hsc-marksheet-certificate-single-document-new-decision : शिक्षण मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
Mumbai: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असून फेब्रुवारी/मार्च २०२६ च्या परीक्षेपासून गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे वेगवेगळे न देता एकाच एकत्रित कागदावर देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जपणूक करणे अधिक सुलभ होणार असून प्रशासकीय प्रक्रियेतही सुलभता येणार आहे.
या संदर्भात लातूर विभागीय शिक्षण मंडळ यांनी लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना लेखी आदेश जारी केले आहेत. मंडळाने स्पष्ट केले आहे की, नवीन एकत्रित दस्तऐवजावर विद्यार्थ्यांचे नाव विशिष्ट क्रमाने म्हणजे प्रथम नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा स्वरूपात छापले जाणार आहे. नावाच्या क्रमात किंवा स्पेलिंगमध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास ती तत्काळ ऑनलाइन पद्धतीने दुरुस्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Ashok kharat case : भोंदूबाबा प्रकरणात नाट्यमय घडामोडी; पत्नी फरार तर मुलगा पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील फोटो अस्पष्ट होते आणि त्यावर मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने नवीन फोटो लावण्यात आले होते, अशा विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर फोटो दुरुस्तीची विशेष लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची ओळख स्पष्ट आणि अचूक राहावी यासाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक असल्याचे मंडळाने नमूद केले आहे.
मंडळाने या दुरुस्ती प्रक्रियेबाबत कडक भूमिका घेतली असून ही अंतिम संधी असल्याचे स्पष्ट केले आहे. या टप्प्यानंतर कोणत्याही प्रकारच्या चुका किंवा दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. जर विद्यार्थ्यांच्या नावात किंवा फोटोमध्ये त्रुटी राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यावर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांनी ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांची दूरदृष्टी ठरली टर्निंग पॉइंट,चंद्रपूरात ‘ज्ञानगंगा’
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची संख्या कमी होणार असून त्यांचे व्यवस्थापन आणि साठवण अधिक सोपी होणार आहे. तसेच भविष्यातील शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रक्रियांमध्ये एकत्रित दस्तऐवजामुळे वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होणार आहे. लातूर विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांनीही आपल्या स्तरावरून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना या नव्या प्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून या निर्णयाचे विद्यार्थ्यांमध्ये स्वागत होत आहे.








