dharashiv-study-pattern-tv-mobile-ban-initiative : ‘या’ जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला चालना देणारा अभिनव निर्णय
Dharashiv : टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष रोखण्यासाठी धाराशिव जिल्हा येथे एक महत्त्वाकांक्षी आणि अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दररोज संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत जिल्हाभरातील सर्व गावांमध्ये टीव्ही आणि मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. या वेळेची सूचना गावात भोंगा वाजवून दिली जाणार असून, हा भोंगा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सुरुवात आणि पालकांसाठी टीव्ही बंद करण्याची अलार्म बेल ठरणार आहे.
या उपक्रमात जिल्ह्यातील सुमारे ७६० ग्रामपंचायतींचा सहभाग असणार असून, प्रत्येक गावावर देखरेख ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल. फक्त निर्णय घेऊन थांबण्याऐवजी त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी गावोगावी विशेष पथके नियुक्त केली जाणार आहेत.
या पथकांमध्ये शिक्षण निरीक्षक आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असणार असून, ते या दोन तासांच्या कालावधीत गावात गस्त घालून घरोघरी भेट देणार आहेत. घरांमध्ये टीव्ही खरोखरच बंद आहेत का आणि विद्यार्थी अभ्यास करत आहेत का, याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यासोबतच जिल्हा परिषद शाळांमध्ये पुन्हा सेमी इंग्रजी पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी विशेष वाचन मोहिमाही राबवली जाणार आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करत अर्चना पाटील यांनी सर्व पालकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दररोज दोन तास टीव्हीचा त्याग करणे गरजेचे असून, हे केवळ प्रशासनाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे सामूहिक कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
Sudhir Mungatiwar : चंद्रपूर बदलतोय वेगाने; मुनगंटीवारांच्या नेतृत्वात विकासाची नवी कहाणी
या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असले तरी, घराघरांत टीव्ही बंद करण्याच्या सक्तीबाबत नागरिकांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








