Discontent over the absence of an OBC column in the caste census; Chief Minister’s assurance brings major relief to the OBC community : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने ओबीसी समाजाला मोठा दिलासा
Mumbai काँग्रेसच्यावतीने सातत्याने लावून धरण्यात आलेल्या आणि देशभरात रान उठवलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून सध्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा करून विरोधकांच्या हातातून हा मुद्दा आधीच हिरावून घेतला होता; मात्र प्रत्यक्षात सुरू झालेल्या जनगणनेच्या प्रक्रियेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम (नोंद) नसल्याचे समोर आल्याने राज्यभरात मोठा असंतोष व संतापाची लाट उसळली आहे.
यावरून विरोधक आक्रमक झाले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींचा समावेश केला जाईल, असे ठाम आश्वासन देत नाराज ओबीसी समाजाला मोठा दिलासा दिला आहे.
Akola Municipal corporation : अदानी सीएनजीला जागा देण्यावर मनपा सभागृहात घमासान!
काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी आक्रमकपणे रेटत आहेत. मात्र, प्रत्यक्ष जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद होत नसल्याने अनेक शहरांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून काही भागांत जनगणनेच्या कामावर बहिष्काराचे हत्यार उपसण्यात आले आहे, तर काही ठिकाणी आंदोलनेही पेटली आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेसने माझा डीएनए ओबीसी आहे, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले होते; ओबीसींची स्पष्ट गणना होत नसताना मुख्यमंत्री गप्प का बसले आहेत? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने सरकारला कोंडीत पकडले होते.
दुसरीकडे, काँग्रेसच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपनेही कंबर कसली असून, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात झालेल्या जनगणनेत जातनिहाय मोजणी का केली नव्हती? असा प्रतिसवाल करत विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
सध्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महत्त्वाचे अधिवेशन सुरू असून, याच व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनगणनेच्या कॉलममध्ये ओबीसींचा अंतर्भाव केला जाईल, अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या ओबीसी समाज आणि संघटनांना मोठे बळ मिळाले असून, विरोधकांच्या हातात असलेले एक धारदार राजकीय शस्त्र या घोषणेमुळे निष्प्रभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








