सहकारातच राहून नेतृत्व करण्याची व्यक्त केली इच्छा
Buldhana जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची परंपरा कायम ठेवण्यात यशस्वी ठरलेले माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. वयाची ६५ वर्षे पूर्ण होत असल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात आपण राजकारणातून थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी एका बँकेच्या आमसभेत केलेल्या भाषणातून स्पष्ट केले. यापुढे सहकार क्षेत्रातच कार्यरत राहून नेतृत्व करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. शिंगणे म्हणाले, “आता माझे वय ६५ वर्षे होत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत माझे वय ६८ वर्षे होईल. त्यामुळे राजकारणात कुठेतरी थांबले पाहिजे, असा निर्णय मी घेतला आहे.” सध्याची बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेता नव्या पिढीला संधी देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘ठाकरे बंधु’ पुन्हा एकत्र, ४ ऑक्टोबरला निवडणूक आयुक्तांविरोधात आक्रमक मोर्चा
यापुढे आपले कार्यक्षेत्र सहकार हेच राहणार असून, जिल्हा बँक आणि मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील काम सुरू ठेवणार असल्याचे शिंगणे यांनी स्पष्ट केले. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी, सभासद तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राजकारणापासून दूर होत असतानाही सहकार क्षेत्रातील आपले कार्य सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या पिढीतील कोणाला मिळणार पाठबळ?
माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातील नेते म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांची प्रदीर्घ राजकीय वाटचाल राहिली आहे. मात्र, २०२४च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता त्यांनी राजकारणातून दूर होण्याचे संकेत दिल्याने त्यांच्या पुढील भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
भाजप नगरसेवकांसाठी निधीचा कट ऑफ ‘१०० मतदार’; पदवीधरसाठी फॉर्म्युला हिट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधकांशी झालेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर डॉ. शिंगणे नव्या पिढीतील कोणाला पाठबळ देणार, याकडेही लक्ष लागले आहे. ते सक्रियपणे मार्गदर्शन करणार की पडद्यामागे राहून पाठिंबा देणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.








