Breaking

CM Devendra Fadnavis : परभणीच्या आमदाराकडून जीवाला धोका

 

Student’s complaint to Chief Minister against MLA Rahul Patil : राहुल पाटीलच्या विरोधात विद्यार्थ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Nagpur भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणले म्हणून परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा दावा नागपुरात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने केला आहे. संबंधित विद्यार्थी हा अकोला जिल्ह्यातील पातूरमधील नवेगाव येथील प्रियदर्शिनी ग्रामीण व आदिवासी उत्कर्ष फाउंडेशनचा अध्यक्षदेखील आहे.

त्याने यासंदर्भात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान, पाटील मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. अथर्व जगन्नाथ ढोणे (२४, गीतानगर, अकोला) असे तक्रारदार विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नागपुरात विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. जून २०२४ मध्ये अमरावतीतील कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या एका गुन्ह्याची नोंद झाली होती. संबंधित प्रकरण हे धर्मादाय आयुक्तांची खोटी सही करून न्यायालयाच्या निर्णयाला कागदोपत्री फिरवून भूखंड खरेदी- विक्रीचे होते.

CM Devendra Fadnavis : नागपुरात कधी होणार पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स?

यात प्रियदर्शिनी ग्रामीण व अकोला येथील पातूरमधील नवेगावच्या आदिवासी उत्कर्ष फाउंडेशनच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी राहुल बिशन खंडारेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. अमरावतीतील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातील अधीक्षक विजय चव्हाण यांनी या प्रकरणात तक्रार केली होती व अथर्व ढोणेने हे प्रकरण समोर आणले होते. या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणाची शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात बरीच चर्चा झाली होती.

Nagpur Education Board : हयात नसलेल्या शिक्षकाला बोर्डाने दिले आदेश

हे प्रकरण अकोला जिल्हा न्यायालय, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. या प्रकरणावरून त्याला जीवाला धोका असल्याची भीती वाटत आहे. सद्य:स्थितीत तो तेथील अध्यक्षदेखील आहे. यासंदर्भात त्याने थेट परभणीचे आ. राहुल पाटील यांच्यावरच आरोप लावला आहे. जर मला किंवा प्रियदर्शिनी ग्रामीण व आदिवासी उत्कर्ष फाउंडेशन या संस्थेच्या सदस्यांना काही झाले तर पाटील यांनाच जबाबदार ठरविण्यात यावे, असा दावा त्याने केला आहे.

त्याने पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल व अमरावती पोलिस आयुक्तांनादेखील तक्रारीची प्रत पाठविली आहे. राहुल पाटील यांनी मात्र या आरोपांचे खंडन केले. माझ्यावर असे आरोप का लावण्यात येत आहेत, याची मला काहीच कल्पना नाही. या प्रकरणात पोलिसच योग्य चौकशी करतील व त्यातून सत्य समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.