Devendra Fadnavis should remember the role he took when he was the Leader of the Opposition : धोबी समाजाला आरक्षण आणि जनाबाई परीट स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा
Akola : राज्यातील इतर मागासवर्गीय समाजांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देण्यात आल्या. मात्र धोबी समाजावर सतत अन्यायच होत आला. हा समाज सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असूनही त्याला आरक्षण मिळत नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना घेतलेल्या भूमिकेची आठवण ठेवून धोबी समाजाला न्याय द्यावा, अशी विनंती अनिल शिंदे यांच्यासह धोबी समाजबांधवांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत अनिल शिंदे म्हणाले, 2005 मध्ये विरोधी पक्षनेते असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोबी समाजाच्या आंदोलन सभेला संबोधित करताना स्पष्ट सांगितले होते की, “मी हाऊसमध्ये असताना तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना प्रश्न केला होता की, राज्य शासनाकडे डॉ. भांडे समितीचा अहवाल असतानाही बार्टीचा अहवाल का मागितला जात आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्या वेळच्या सरकारला धोबी समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते.”
Vijay Jawandhiya : ..तर मोदींनी सांगून टाकावे की, ‘शेतकऱ्यांनो सोयाबीन पेरू नका’
आज मुख्यमंत्रीपदावर असलेल्या देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बार्टीचा अहवाल मागवत आहेत. मग हे धोबी समाजाला फक्त झुलवत ठेवायचे काम नाही का? जर त्यांना खरंच धोबी समाजाला आरक्षण द्यायचे असेल, तर त्यांनी बार्टीचा अहवाल मागवण्याऐवजी डॉ. भांडे समितीचा अहवाल आणि त्यातील शिफारशी केंद्र सरकारला पाठवाव्यात, अशी मागणी शिंदे यांनी केली.
शासनाच्या भूमिकेवर टीका..
राज्य शासनाने 21 सप्टेंबर 2019 रोजी डॉ. भांडे समितीचा अहवाल स्वीकारला आहे. या अहवालाच्या तिसऱ्या शिफारशीनुसार धोबी समाजाला तत्काळ आरक्षण आणि इतर सवलती लागू करायला हव्या होत्या. मात्र, आजपर्यंत शासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. सन 2001 मध्ये अहवाल प्राप्त होऊनही तब्बल 20 वर्षांनी तो स्वीकारण्यात आला, परंतु धोबी समाजाला त्यातील शिफारशी लागू करण्यात आलेल्या नाहीत.
जनाबाई परीट यांचे स्मारक उभारावे..
छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे तुळापूरच्या नदीत टाकण्याचा आदेश दिला. त्यावेळी बादशहाचे फर्मान होते की, या तुकड्यांना कोणीही हात लावल्यास त्यांचे मुंडके छाटले जाईल. या आदेशाला न जुमानता, जनाबाई परीट यांनी आपल्या काही महिलांसह छत्रपती संभाजी महाराजांचे विखुरलेले अवशेष गोळा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
Devendra Fadanvis : शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन उभारी आणणारा प्रकल्प सुरू केलाय !
इतिहासातील या महत्त्वपूर्ण आणि शौर्यपूर्ण घटनेला उचित सन्मान मिळावा म्हणून जनाबाई परीट यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे धोबी समाजातर्फे स्वागत करण्यात आले. मात्र, जनाबाई परीट यांच्या स्मारकाची उभारणीही शासनाने करावी, असे आवाहन करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला अनिल शिंदे यांच्यासह आकाश कवडे, गजानन चंदेलकर, दादाराव बाभुळकर, गजानन लाहुळकर, सौ. मीनाताई कवडे, सौ. सुवर्णताई ठाकरे, हरिष मसके, प्रेमशेठ कनोजिया, पवन कनोजिया, वैभव भातूलकर, ऍड. विजय शिरले, प्रथमेश कणखर आदी उपस्थित होते.