MLA Siddharth Kharat will protest if illegal businesses are not stopped : मेहकरमध्ये औद्योगिक विकासाचा पूर्ण अभाव
Buldhana : जिल्ह्यातील अवैध धंदे तातडीने बंद न झाल्यास नागरिकांच्या हक्कांसाठी आंदोलन करू, असा इशारा आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला आहे. तसेच, राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणांवरही त्यांनी टीका केली. राज्य सरकार दावोस येथे जाऊन मोठी गुंतवणूक आकर्षित करण्याचा दावा करते. मात्र, मेहकरमध्ये औद्योगिक विकासाचा पूर्ण अभाव आहे. औद्योगिक विकासाचे विकेंद्रीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे, आणि मेहकरला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
मंगळवारी (१ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार खरात म्हणाले की, नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही सोयाबीन साठवलेले आहे. त्यामुळे संपूर्ण सोयाबीन खरेदी होणे गरजेचे आहे. शासनाच्या कर्जमाफी योजना आणि आर्थिक मदतीच्या घोषणा केवळ आश्वासन असून, त्या प्रत्यक्षात शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
MLA Siddharth Kharat : जलजीवन मिशन योजनेत गैरप्रकार, विधानसभेत गाजला विषय
लोणारच्या विकासासाठी पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे. तेथे विमानतळ व्हावे तसेच लँड बँकेच्या माध्यमातून योग्य पद्धतीने जमीन वाटप होणे गरजेचे आहे, अशीही मागणी त्यांनी केली. जलजीवन मिशन आणि घरकुल योजना यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Siddharth Kharat : नागरेंच्या मुलाचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे!
डोणगाव येथील प्रसन्न वानखेडे आणि देऊळगाव राजा येथील आदर्श शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी आमदार खरात यांनी विधानसभेत आवाज उठवला. त्यांच्या मृत्यूच्या तपासाची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेला उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, युवासेनेचे आकाश घोडे, दत्ता घनवट, साहेबराव हिवाळे, विजय मोरे, ॲड. संदीप गवई, ऋषी जगताप, स्वप्नील हाडे, उपतालुकाप्रमुख रमेश देशमुख, जीवन घायाळ, विजय लहाने, संतोष लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.