Women reached the Gram Panchayat directly with water pots : देऊळगाव घुबे येथे थेट ग्रामपंचायतीत पोहोचल्या महिला
Buldhana एकेकाळी शेतकरी चळवळीने राज्यभरात ओळख निर्माण करणाऱ्या देऊळगाव घुबे गावात आज पाण्याच्या भीषण टंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावातील महिलांनी सोमवारी (२१ एप्रिल) सकाळी संतप्त होऊन ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर जोरदार आवाज उठवला.
गावात दोन तलावांवर आधारित नळयोजना अस्तित्वात असूनही ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे एप्रिलच्या उष्णतेत देखील नळाला पाणी नाही. महिलांनी संतापून विचारले की, “आम्ही करपट्टी व नळपट्टी वेळेवर भरतो, तरीही पाणी का मिळत नाही?”
Sudhir Mungantiwar Meets Nitin Gadkari : मुनगंटीवारांनी मागणी केली, गडकरींची ‘ऑन दि स्पॉट’ मंजुरी!
गेल्या महिनाभरात गावात पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा झालेला नाही. महिलांना दररोज उन्हात १ ते २ किलोमीटर अंतर डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीकडून कोणतेही नियोजन नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
“पाणी मिळेपर्यंत गप्प बसणार नाही,” असा निर्धार महिलांनी व्यक्त केला असून, तातडीने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा, नळदुरुस्ती आणि नियमित पाणी उपलब्धतेची हमी या मागण्यांसह प्रशासनाला २४ तासांची मुदत दिली आहे. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायतीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. एकीकडे गावाने शेतकरी चळवळीत नेतृत्व दिलं, तर दुसरीकडे आज तिथेच महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही मोठी शोकांतिका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.








