Race for the post of Amravati BJP city president : भाजप शहराध्यक्षपदासाठी रस्सीखेच; फडणवीस–बावनकुळेंच्या निर्णयाकडे लागले लक्ष
Amravati भारतीय जनता पक्षाच्या अमरावती शहराध्यक्षपदासाठी नवे नेतृत्व निश्चित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. १० एप्रिल रोजी नव्या अध्यक्षाच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हे अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नव्या चेहऱ्यांचा विचार सुरू आहे. डॉ. नितीन धांडे, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, प्रा. रवींद्र खांडेकर, चेतन पवार आणि विवेक कलोती यांची नावे शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. ही नावे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहे. त्यापैकी एका नावावर अंतिम मोहोर उमटवण्यात येईल.
Bacchu Kadu : अजितदादांच्या घरापासून आंदोलन सुरू होणार, फडणविसांच्या घरापुढे सांगता!
या निवडीसाठी पडद्यामागील हालचालींना मोठा वेग आला असून, काही इच्छुकांनी थेट पक्षाच्या ‘परिवार’कडेही साकडे घातल्याचे सांगितले जाते. तसेच काहींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मनधरणी सुरू केली आहे. भाजपने अमरावती महापालिकेत गेल्या निवडणुकीत बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली होती. आगामी निवडणुकीत पुन्हा विजय मिळवण्यासाठी सशक्त, स्थानिक जनतेशी निगडित आणि संघटनात्मक दृष्टिकोन असलेले नेतृत्व गरजेचे मानले जात आहे. त्यामुळेच वरिष्ठ नेत्यांकडून सर्व इच्छुकांची पारख काटेकोरपणे केली जात आहे.
Farmer’s agitation : वारे विदर्भाच्या पोरा.. सातबारा कोरा.. तुझा खोटा रे नारा..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावतीशी घनिष्ठ नाते असल्याने त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडला जाण्याची शक्यता अधिक आहे. तसेच, त्यांनीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संभाव्य उमेदवारांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय होईल. दरम्यान, पुन्हा एकदा प्रवीण पोटे पाटील यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यामुळे भाजपच्या शहराध्यक्षपदावर कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.