व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण खाट सभांच्या माध्यमातून काँग्रेसचा जनसंपर्क; जनतेचा विश्वास पुन्हा मिळविण्याची धडपड!

खाट सभांच्या माध्यमातून काँग्रेसचा जनसंपर्क; जनतेचा विश्वास पुन्हा मिळविण्याची धडपड!

दिवाळीचा मुहूर्त साधत बैठकांचा धडाका; दुकानांच्या पायऱ्यांवर बसून थेट संवाद

 

Washim : जनमानसात पुन्हा आपले स्थान निर्माण करण्यासाठी काँग्रेसने आता थेट जनतेच्या दारात जाण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे. मोठ्या सभा, व्यासपीठे आणि राजकीय भाषणांचा गाजावाजा बाजूला ठेवत गल्लीबोळांत नागरिकांशी संवाद साधण्यावर पक्षाने भर दिला आहे. दिवाळीचा मुहूर्त साधत जिल्हाध्यक्ष राजू चौधरी, शहराध्यक्ष सागर गोरे आणि उज्ज्वल देशमुख यांनी चावडी बैठकांचे आयोजन करीत जनसंपर्काचा नवा प्रयोग सुरू केला आहे.

या बैठकांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही मोठा मंडप किंवा भव्य व्यासपीठ नाही. गल्लीतील दुकानांच्या पायऱ्यांवर बसून नागरिकांशी चर्चा, स्थानिक प्रश्नांची विचारपूस आणि जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय नेते थेट सामान्य नागरिकांमध्ये जाऊन बसत असल्याने या उपक्रमाची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसच्या या प्रयत्नामागे बदललेल्या राजकीय परिस्थितीत जनतेशी तुटलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची भूमिका असल्याचे मानले जात आहे. केवळ निवडणुकीच्या काळात मतदारांपर्यंत पोहोचण्याऐवजी नियमितपणे स्थानिक प्रश्न समजून घेणे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, हा या बैठकांचा उद्देश असल्याचे चित्र आहे.

पोलाद प्रकल्पाच्या भूसंपादनावर मुख्यमंत्र्यांचा ‘स्टे’ ? शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन घेणार नाही!

 

मात्र, या खाट सभांवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते, नेत्यांनी थेट नागरिकांमध्ये जाऊन संवाद साधणे हा जनसंपर्काचा महत्त्वाचा प्रयत्न आहे. तर विरोधकांच्या गोटातून दुकानांच्या पायऱ्यांवर बसून राजकीय पायऱ्या चढता येतात का, असा उपरोधिक सवाल उपस्थित केला जात आहे.

खाट सभांमध्ये जमणारी गर्दी म्हणजे जनतेचा विश्वास मिळाल्याचे प्रमाणपत्र नव्हे. नागरिकांचे प्रश्न ऐकणे आणि त्यावर प्रत्यक्ष पाठपुरावा करणे, ही खरी कसोटी ठरणार आहे. त्यामुळे या बैठकांमधून काँग्रेसला संघटनात्मक बळ किती मिळते आणि जनतेशी असलेले नाते कितपत दृढ होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अखेर या खाट सभांमधून काँग्रेसच्या राजकारणाला नवी दिशा मिळते की राजकीय खुर्च्यांपुरताच हा संवाद मर्यादित राहतो, याचे उत्तर आगामी काळच देईल!

 

___

 

error: Content is protected !!