Shinde Sena leader confesses to colluding with Nana Patole : आम्हीच नाही, तर इतरही पक्ष स्थानिक पातळीवर आघाडी करत असतात
Nagpur : राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो. सर्व पुढारी आपआपल्या सोयीने फायद्याचे राजकारण करत असतात. सहकार क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर पक्षीय राजकारण लागूच पडत नाही. अनेक ठिकाणी अभद्र युती झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सोयीच्या राजकारणाला सुरूवात झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी काँग्रेसचे बलाढ्य नेते नाना पटोले यांच्याशी हातमिळवणी केली आहे. अनेक चर्चा सुरू असताना त्याबद्दल त्यांनीच स्पष्ट सांगितले आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना आमदार भोंडेकर यांनी सांगितले की, सहकार क्षेत्रामध्ये आघाडी असते. मी नाना पटोले यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. अनेक पक्ष स्थानिक पातळीवर आघाडी करत असतात. यात कुठेही पक्ष नसतो किंवा चिन्हही नसते.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या संदर्भात बोलताना आमदार भोंडेकर म्हणाले, अतिवृष्टी झालेली आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आमदार भोंडेकर पक्षात सध्या नाराज आहेत का, असे विचारले असता, काही नाराजी नाही. पक्ष अधिक मजबूत करण्याचे काम सुरू आहे. पूर्वी दोन जिल्हाप्रमुख असायचे. आता आम्ही कामात सुटसुटीतपणा आणण्यासाठी तीन जिल्हाप्रमुख नियुक्त केले आहेत. त्यामुळे पक्ष संघटना वाढली असल्याचे आमदार भोंडेकर यांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणत होते ‘मला माहित नाही’, त्यांच्याच उपस्थितीत पक्षप्रवेश
पक्षप्रवेशाबाबत बोलताना आमदार भोंडेकर म्हणाले, भंडारा जिल्ह्यात ज्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, ते काही फार मोठे लोक नव्हते. तसेच कोण पक्ष सोडून गेला, त्यापेक्षा किती नवीन लोक आले, हे महत्वाचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता आम्ही पक्ष बदल केले आहेत. त्यामुळे काही लोक नाराज आहेत. पण ही नाराजी जास्त काळ राहणार नाही. कारण श्रीकांत शिंदे नियमित बैठका घेत असतात. त्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा होते. हे पक्षासाठी फायद्याचे आहे.