Local election will be held under the leadership of new commissioner : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचे संकेत; प्रभाग रचना प्रक्रियेला वेग
Amravati अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन स्तरावर तयारी सुरू झाली आहे. ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्याने पदभार स्वीकारलेल्या आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पार पडणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार अमरावती महापालिकेने प्रभाग रचनेची प्रारंभिक प्रक्रिया सुरू केली असून कालबद्ध कार्यक्रमानुसार पुढील टप्प्यांवर काम सुरू आहे.
CM Devendra Fadnavis : नागपुरातील ४२६ झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना हक्काचे घर!
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरुवातीला प्रारूप प्रभाग रचना, त्यानंतर अंतिम प्रभाग रचना, मतदार यादी तयार करणे आणि मतदान केंद्र निश्चिती ही कामे केली जाणार आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून ४५ दिवसांची आचारसंहिता लागू होईल. या सर्व प्रक्रिया लक्षात घेता निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता अधिक आहे.
दरम्यान, नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीईओपदावर कार्यरत असलेल्या सौम्या शर्मा यांची अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. याआधी त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी त्या प्रथमच सांभाळत आहेत आणि त्यांच्याच कार्यकाळात ही निवडणूक पार पडणार आहे.
येणारी सार्वत्रिक निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग प्रणालीवर आधारित असेल. ही रचना २०११ च्या जनगणनेच्या आधारे करण्यात आली असून अनुसूचित जाती व जमातींसाठी प्रभागांमध्ये आरक्षण दिले जाणार आहे. अमरावती महापालिकेत सध्या एकूण २२ प्रभाग असून त्यापैकी २१ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार सदस्य तर एका प्रभागात तीन सदस्य निवडले जातील. अशा प्रकारे एकूण ८७ सदस्यांची निवड होणार आहे.
Shivbhojan Thali : गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजन थाळीचे अनुदान रखडले!
नगर विकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. प्रभाग रचना, मतदार यादी, मतदान केंद्र निश्चिती आणि आचारसंहिता लागू केल्यानंतर निवडणूक दिनांक निश्चित केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख अक्षय निलंगे यांनी दिली.