Breaking

Hindi Language Conflict : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र!

Raj and Uddhav Thackeray will protest together against compulsion of Hindi : राज आणि उद्धव ठाकरे 5 जुलैच्या मोर्च्यात होणार सहभागी

Mumbai : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात 5 जुलै रोजी मुंबईत मराठी माणसांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की दोन्ही ठाकरे बंधूंनी कोणतेही आढेवेढे न घेता, परस्परांच्या भूमिका मान्य केल्या आहेत.

त्रिभाषा सूत्र संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल राज ठाकरेंची भेट घेऊन शासनाची भूमिका स्पष्ट केली. मात्र यासंदर्भात दिलेले स्पष्टीकरण राज ठाकरेंनी फेटाळले, आणि समस्त मराठीजनांच्या मोर्चाची घोषणा केली. त्याचवेळी तिकडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची मराठी कृती भाषा समिती सोबत बैठक सुरू होती. यावेळी 7 जुलैला मोर्चाचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले होते. राऊत यांनी सांगितले की, राज ठाकरेंनी जेव्हा घोषणा केली तेव्हा आम्ही बैठकीमध्ये होतो. आम्हाला याबाबत माहिती नव्हती.

Congress State President Harshawardhan Sapkal : इंदिरा गांधींनी पराभव पत्करला, पण मतांची चोरी केली नाही !

मातोश्री वरील बैठक संपल्यानंतर राज ठाकरे यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितले की, तुम्ही 7 तारखेला आंदोलन ठरवलं. मी आत्ताच आंदोलनाची घोषणा केली. मराठी भाषेचे दोन वेगळे मोर्चे निघणं बरं दिसत नाही. हे आंदोलन एकत्र झाले तर जास्त प्रभाव पडेल. मराठी भाषिकांना आनंद होईल. यावर मी म्हटलं ठीक आहे. मी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करतो. त्यानंतर, पुन्हा मातोश्रीवर गेलो आणि उद्धव ठाकरे यांना हे सगळं सांगितलं.

त्यावर उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता सांगितले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं गरजेचं आहे. सहा तारखेची आषाढी एकादशी असल्याने आंदोलन मराठी माणसांपर्यंत पोहोचवणं अडचणीचं जाईल. त्यामुळे सात तारखेला आपण आंदोलन ठरवले होते. आता एकत्र करणार असू तर अडचण नाही. आपण त्यांच्याशी चर्चा करा. सात तारखे ऐवजी मोर्चाची तारीख 5 जुलै करावी असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Dharmapal Meshram : फासे पारधी समाजावर होणारे अमानवीय अत्याचार आटोक्यात येणार !

त्यानंतर मी पुन्हा राज ठाकरे यांना फोन करून यासंदर्भात विनंती केली. मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख काय बोलले हे सांगितलं. त्यांनीही तात्काळ होकार देत त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून मला परत फोन केला. आपण सगळेजण 5 जुलैला एकत्रपणे मोर्चात सहभागी होऊ असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.