प्रस्थापित यंत्रणांसमोर अपक्षाची दमदार कामगिरी; मतपेटीतून पदवीधरांच्या बदलत्या मनोवृत्तीचे संकेत
Wardha : निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर निलेश कराळे मास्तरांनी केलेली टिप्पणी सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवता आला नसला, तरी आपल्या कामगिरीने प्रस्थापित राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेण्यात कराळे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत विजयाच्या आकड्यांइतकीच चर्चा त्यांच्या मतांची आणि वैयक्तिक प्रभावाचीही होत आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघ म्हटले की भाजप आणि काँग्रेस यांच्यातील अटीतटीची लढत, अशीच राजकीय समीकरणांची मांडणी केली जात होती. भाजपसाठी हा परंपरागत प्रभावाचा मतदारसंघ, तर काँग्रेससाठी २०२० मध्ये मिळवलेला विजय टिकवण्याचे आव्हान होते. दोन्ही पक्षांनी मतदार नोंदणीपासून निवडणुकीच्या तयारीपर्यंत संघटनात्मक ताकद पणाला लावली. मात्र, या समीकरणांमध्ये अपक्ष निलेश कराळे मास्तरांची चर्चा तुलनेने मागे होती. मात्र शेवटच्या टप्प्यात ते चर्चेत आले.
मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा सलग दुसरा विजय; नेतृत्वावर आत्मचिंतनाची वेळ
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यानंतर चित्र बदलू लागले. पहिल्या फेरीत सुमारे १४ हजार आणि दुसऱ्या फेरीअखेर २४ हजारांहून अधिक प्रथम पसंतीची मते मिळाल्याने कराळे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या कामगिरीमुळे निवडणूक केवळ दोन प्रमुख पक्षांमधील लढत राहिली नाही, तर अपक्ष उमेदवाराच्या प्रभावाचीही कसोटी ठरली.
या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी केल्याचे दावे केले होते. त्या तुलनेत कराळे मास्तरांनी स्वतंत्र यंत्रणा उभारल्याचे चित्र नव्हते. विद्यार्थी, पदवीधर आणि विविध प्रश्नांवरील आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यातून मिळालेल्या मतांनी त्यांच्या वैयक्तिक संपर्काचा आणि प्रभावाचा मुद्दा ऐरणीवर आणला.
मात्र, ही मते नेमकी कोणत्या पक्षाच्या पारंपरिक मतदारांकडून आली किंवा त्यामागे कोणते सामाजिक, राजकीय घटक होते, याचा निष्कर्ष सध्या काढला जात आहे. यात अपक्ष उमेदवाराला मिळालेला प्रतिसाद दुर्लक्षित करता येणार नाही.
पदवीधर मतदार हा सुशिक्षित, जागरूक आणि प्रश्नांची उत्तरे मागणारा मतदार म्हणून ओळखला जातो. रोजगार, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, युवकांचे प्रश्न आणि प्रशासनातील उत्तरदायित्व या मुद्द्यांवर त्याच्या अपेक्षा असतात. अशा मतदारसंघात केवळ पक्षाचे नाव, संघटनात्मक ताकद किंवा राजकीय वारसा पुरेसा ठरतोच असे नाही, हा संदेश कराळे यांच्या कामगिरीतून पुढे आला आहे.
त्यांच्या मतांचा अर्थ प्रस्थापित पक्षांविरोधातील स्पष्ट नाराजी असा सरसकट लावणे योग्य ठरणार नाही. मात्र, प्रमुख पक्षांच्या पलीकडे जाऊन एखाद्या उमेदवाराला संधी देण्याची मतदारांची तयारी या निवडणुकीत दिसून आली. त्यामुळे कराळे यांची कामगिरी ही केवळ अपक्षाच्या मतांची आकडेवारी नसून, पदवीधर राजकारणातील बदलत्या अपेक्षांचा अभ्यास करण्याची संधीही आहे.
निवडणूक जिंकणारा उमेदवार लोकप्रतिनिधी होतो; पण मतदारांच्या चर्चेत राहणारा उमेदवार राजकीय समीकरणांना नवे प्रश्न विचारतो. नागपूर पदवीधर निवडणुकीत कराळे मास्तरांनी मिळवलेला प्रतिसाद हाच या निकालातील महत्त्वाचा राजकीय धडा ठरतो. आता या प्रतिसादाचे संघटनात्मक ताकदीत रूपांतर करण्यासाठी ते पुढे काय भूमिका घेतात, यावर त्यांच्या राजकीय प्रवासाची पुढील दिशा अवलंबून असेल.
___








