Who will join Uddhav and Raj Thackeray in the anti-Hindi march from NCP’s Sharad Pawar : भाषा शिक्षण हा केवळ राजकीय नाही, तर महत्वाचा सामाजिक विषय
Nagpur : इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली. ५ जुलैला त्यासाठी मराठी माणसाचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसणार आहे, हे राज ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही या मोर्चाला पाठींबा आहे. आता पवारांकडून या मोर्चात कोण सामील होणार, हा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीसाठी सुप्रिया सुळे आज (ता. २८) नागपुरात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांची मुलगी पौर्णिमा केदार यांच्या इन्स्टिट्यूच्या कार्यक्रमातही मी सहभागी होणार आहे. हिंदी भाषेबद्दल विचारले असता. भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अतिशय महत्वाचा सामाजिक आणि शैक्षणिक विषय आहे. भाषेच्या संदर्भातील जाणकार, तज्ज्ञ यांचे विचार जाणून घेणे आवश्यक आहे. हा विषय फक्त राजकारण म्हणून हाताळणे योग्य होणार नाही.|
Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादीला फायदा होणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठीसाठी होणाऱ्या मोर्चात पूर्ण शक्तिनीशी सहभागी होणार आहे. आमच्या पक्षाकडून या मोर्चात कोण सहभागी होईल, हे आज किंवा उद्या स्पष्ट केले जाईल. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे आमच्यावर सर्व लोकांच्या भावना ऐकून घेण्याची जबाबदारी असते. हीच लोकप्रतिनिधींची खरी ताकद आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिक्षण हा गंभीर विषय आहे. सरकार त्यांचं की आमचं, हा प्रश्न नाही. शिक्षणासंदर्भातला निर्णय तज्ज्ञांनी आणि पालकांनी मिळून घ्यायला हवा, असेही त्या म्हणाल्या.