Local elections unlikely to be held before Diwali : इच्छुकांच्या तलवारी म्यान; दिवाळीपूर्वी निवडणूक होण्याची शक्यता मावळली
Nagpur नवरदेव बाशिंग बांधायला उत्सुक असतो. आता लग्न होणार म्हणून कमालीचा आनंदी असतो. पण ऐनवेळी मुहूर्ताचा घोळ झाल्यामुळे त्याचा हिरमोड होतो आणि सगळी स्वप्न ‘होल्ड’वर ठेवतो. अगदी अशीच परिस्थिती सध्या स्थानिक निवडणुकीत लढण्यास इच्छुक असलेल्यांची झाली आहे. महानगरपालिकेची निवडणूक दिवाळीपूर्वी होणार म्हणून सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण आता तशी शक्यता नसल्यामुळे सर्वांनी तलवारी म्यान केल्याचे चित्र आहे.
निवडणूक होणार म्हणून इच्छुकांनी गेल्या तीन वर्षांमध्ये थांबलेला जनसंपर्क वाढवला. त्यासाठी पैसा खर्च होऊ लागला. रोजच्या भेटी-गाठी, चहा पाण्याचा खर्च वाढला. मात्र, नवीन वेळापत्रकानुसार ६ ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यानंतर सण-उत्सव आणि विधिमंडळ अधिवेशनामुळे निवडणुका वर्षअखेर किंवा नवीन वर्षात होण्याचे संकेत आहेत. निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे अनेक इच्छुकांनी प्रभागातील जनसंपर्क मोहीम थांबवली आहे.
Nagpur Divisional Commissioner : तृतीयपंथींसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेली नागपूर महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवक सक्रिय झाले होते. मात्र, प्रभाग रचनेच्या अंतिम अधिसूचनेस पुन्हा मुदतवाढ मिळाल्याने इच्छुकांचा उत्साह ओसरला आहे.
महापालिकेचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. नगरसेवक नसल्याने थेट राज्य सरकार व प्रशासक मिळून महापालिकेचा कारभार चालवत आहेत. परंतु, नागरिक मात्र मूलभूत सुविधांच्या समस्यांनी त्रस्त आहेत. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये २०-२५ वर्षांपूर्वीची गटार व्यवस्था आहे. ती सध्याच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेशी नाही. परिणामी वारंवार तुंबणाऱ्या गटारांमुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. गटार सफाईनंतरही काही दिवसांत पुन्हा गडर तुंबल्याच्या तक्रारी येत आहेत, पण प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे.