Breaking

Local Body Election : निम्म्या पंचायत समित्यांवर महिलाराज !

Mahilaraj will be on half of the panchayat committees Local Body Election : सभापतीपदाचे आरक्षण जाहीर; २० जानेवारीला निवडणूक; आमदारांच्या मनातील सभापती कोण?

Gondia Local Body Election : जिल्ह्यातील निम्म्या पंचायत समित्यांवर आता महिलाराज असणार आहे. आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आता महिलांच्या हाती कारभार येणार आहे, हे निश्चित झाले आहे. सभापतीपदासाठी २० जानेवारीला निवडणूक होणार आहे.

जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. यात तीन ठिकाणी सर्वसाधारण व तीन ठिकाणी सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण जाहीर झाले. याशिवाय एका ठिकाणी अनुसूचित जाती (महिला) व एका ठिकाणी अनसूचित जमाती असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे चार पंचायत समित्यांमध्ये महिलाराज येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Check bounced : मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेणाऱ्या आईला कारावास !

जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. या बैठकीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, अधिकारी व विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पंचायत समिती सभापतिपदासाठीची सोडत स्वरा सोमवंशी या चार वर्षीय बालिकेच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे काढण्यात आली.

उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांनी आरक्षणाबाबतची संपूर्ण प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितली. लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण ठरविण्यात येते, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांचे व शंकेचे समाधान करण्यात आले.

२० जानेवारीला निवड
पंचायत समिती सभापतिपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. आता आठही पंचायत समित्यांमध्ये सभापतीपदाची निवडणूक २० जानेवारीला घेण्यात येणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रमसुद्धा तयार झाला असल्याचे उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांनी यावेळी सांगितले.

Dr. Pankaj Bhoyar स्त्रीशक्तीने भारतात इतिहास घडवला

चढाओढ अन् रस्सीखेच
गोंदिया, तिरोडा, देवरी, गोरेगाव, सालेकसा आणि आमगाव या पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण निघाले आहे. त्यामुळे या ठिकाणी सभापतिपदासाठी चांगलीच रस्सीखेच व चढाओढ होण्याची शक्यता आहे. तर प्रमुख पक्षांच्या नेत्यांसमोरदेखील सभापतिपदी कुणाची वर्णी लावायची, असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सभापतिपदाची निवडणूक २० जानेवारीला होणार असल्याने पुढील दहा दिवस यावरून राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

आमदारांची भूमिका महत्त्वाची
जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांमध्ये सभापती, उपसभापतिपदी कुणाची वर्णी लावायची, यात आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यात विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, राजकुमार बडोले, संजय पुराम या चारही आमदारांची समावेश आहे. त्यामुळे आमदारांच्या मनातील सभापती कोण हे २० जानेवारीला निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.