Shinde’s Shiv Sena challenges BJP : आमदार गायकवाडांची सभा ठरली भविष्यातील संघर्षाची नांदी
Chikhali महायुतीतील मित्रपक्ष असूनही, शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्या पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या चिखलीत थेट शक्तीप्रदर्शन केले. आपल्या मित्रपक्षालाच आव्हान दिले. “ही फक्त सुरुवात आहे,” अशा शब्दांत गायकवाड यांनी स्थानिक राजकारणात दंड ठोकल्याचे स्पष्ट केले.
९ ऑगस्टला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भाजपच्या नेत्यांसोबत मंचावर असलेले गायकवाड, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० ऑगस्ट रोजी, त्याच मैदानावर स्वतःची जंगी जनसंवाद सभा घेतात. सभेत त्यांनी तालुक्यात गावागावांत शाखा स्थापना, वॉर्डांमध्ये संघटन बांधणी, जुनी शिवसेना पुन्हा उभारणी आणि शासनाच्या योजना थेट शेतकरी व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्याचा निर्धारही त्यांनी केला.
Gopinath Munde : मुंडे साहेबांना मुख्यमंत्री करण्याचा विचार केला होता
सभेच्या निमित्ताने झालेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे चिखली मतदारसंघातील भाजप-शिंदेसेना समीकरणांवर नवा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बैठकीस युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड, विजय अंभोरे, अनुजा सावळे, राहुल खेडेकर, प्रा. अमोल वानखेडे, प्रा. अनिल रिंढे, गजानन लांडे, कपिल खेडेकर, विलास घोलप, रोहित खेडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
सभेत आमदार गायकवाड यांनी चिखली नगरपालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही शिवसेनेचे सदस्य निवडून आणण्याचे उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे आणि महायुतीतील अंतर्गत स्पर्धेची चाहूल लागली आहे.








