Rohit Pawar vs. Organizers clash over ‘Voice of Devendra’ competition : ‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ स्पर्धेवरून रोहित पवार विरुद्ध आयोजक संघर्ष
Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त “व्हॉईस ऑफ देवेंद्र” ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विविध महाविद्यालयांना परिपत्रक पाठविण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विद्यापीठ प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी विद्यापीठावर राजकीय अजेंडा राबवण्याचा आरोप करत, शिक्षणाच्या मंदिरांना राजकारणा पासून दूर ठेवण्याची मागणी केली.
मात्र, स्पर्धेचे आयोजक स्वारंभ फाउंडेशन, नाशिक प्रतिष्ठान आणि आय – फेलोज फाउंडेशन यांनी रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. या स्पर्धेचे समन्वयक वैभव सोलनकर यांनी, “ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केलेली नसून विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आयोजित केली आहे. रोहित पवार खोटी माहिती पसरवत आहेत,” असा आरोप केला. तसेच, “शरदचंद्र पवार यांच्या नावाने तुम्ही विविध शैक्षणिक संस्थांमध्ये स्पर्धा आयोजित करता, तेव्हा तुम्हाला हरकत नसते, मग आता का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Maharashtra politics : महायुती सरकारला मित्रपक्षांच्या वादग्रस्त नेत्यांचा फटका
दरम्यान, रोहित पवार यांनी पुन्हा ट्विट करून विद्यापीठाचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, “एकीकडे विद्यापीठ सांगते की त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली नाही, आणि दुसरीकडे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत पाठवलेले पत्र मागे घेते. हा स्पष्ट दुटप्पीपणा आहे.” त्यांनी विद्यापीठावर छुप्या पद्धतीने राजकीय अजेंडा राबवण्याचा आरोप करत, महिन्याअखेरपर्यंत अशा सर्व प्रकरणांची पोलखोल करण्याचा इशारा दिला.
स्पर्धेविरोधातील वाढत्या वादामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक मागे घेतले आहे. मात्र, रोहित पवारांनी स्पष्ट केले की हा वाद केवळ या स्पर्धेपुरता मर्यादित नसून, विद्यापीठांमध्ये राजकीय अजेंडा राबवण्याच्या इतर अनेक प्रकरणांवर ते लवकरच कारवाईची मागणी करणार आहेत.
Cabinet meeting : 15 हजार पोलिस भरतीसह चार महत्त्वाचे निर्णय
रोहित पवार यांनी असेही म्हटले की, “निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या विभागाप्रमाणे काम करत असल्याचे संपूर्ण देश पाहत आहे. आता विद्यापीठे देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास कुणावर ठेवायचा? विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर आणि ‘व्हॉईस ऑफ डेमोक्रसी’ बळकट करण्यावर लक्ष दिले पाहिजे.”
_____








