Demand for special package for farmers affected by heavy rains : नुकसानग्रस्त विदर्भासाठी विशेष पॅकेजची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन
Akola पश्चिम विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीसह ग्रामीण आणि शहरी भागात मोठे नुकसान झाले आहे. रस्ते, पूल, वीज वितरण व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांची हानी झाली असून अनेक गावांमध्ये ढगफुटीची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर Randhir Sawarkar यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची मुंबईत भेट घेऊन नुकसानग्रस्त भागासाठी विशेष पॅकेजची मागणी केली.
अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांत ढगफुटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले असून ग्रामीण जीवन अस्तव्यस्त झाले आहे. प्रत्येक तालुक्यात सुमारे २० ते २५ गावे ढगफुटीच्या तडाख्यात आली आहेत. ग्रामीण भागातील घरांचे नुकसान झाले आहे, तर वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस मदत व मूलभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी द्यावा, अशी मागणी सावरकर यांनी केली.
Chandrashekhar Bawankule : शिक्षकांचा दोष नाही, संस्थाचालकांची संपत्ती जप्त करा !
या संदर्भात कृषीमंत्री दत्ताजी भरणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थमंत्री अजित पवार यांच्याशीही सावरकर यांनी चर्चा केली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी विभागीय आयुक्तांना तातडीने अहवाल तयार करण्याचे आणि पंचनामे राज्य शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले. यासोबतच खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला शहर, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर, रिसोड या शहरी भागांना विशेष निधी देण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार सावरकर यांना सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित यंत्रणांना प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासन गंभीर असल्याचे आश्वासन दिले. पालकमंत्री आकाश कुंडकर हेही या कामावर लक्ष ठेवून आहेत.
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीची मदत अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि जनजीवन सुरळीत करण्यासाठी त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे.








