Green signal for protest after accepting 20 conditions : 20 अटी मान्य केल्यावर आंदोलनाला हिरवा कंदील
Mumbai : मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडणारे मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट रोजी अंतरवली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले असून, सध्या ते शिवनेरीवर दाखल झाले आहेत. 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आंदोलनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी मिळण्यासाठी जरांगेंना एक हमीपत्र द्यावे लागले. “आंदोलनादरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही,” याची लेखी हमी त्यांनी पोलिसांना दिली असून, तब्बल 20 अटी मान्य करूनच हे आंदोलन करण्याची मुभा मिळाली आहे.
हमीपत्रात जरांगे यांनी स्पष्ट केले आहे की, आंदोलना दरम्यान पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वयंसेवकांची तैनाती याची पूर्ण व्यवस्था आयोजक करतील. धरणे आणि निदर्शने फक्त विहित वेळेत म्हणजे सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेतच होतील, वाहतुकीला अडथळा येणार नाही आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, अशी हमी देण्यात आली आहे. आंदोलक कोणत्याही प्रकारची शस्त्रे, लाठ्या, तलवारी, अग्निशस्त्रे जवळ ठेवणार नाहीत, तसेच उचकावणारी भाषणे करणार नाहीत, असेही नमूद केले आहे.
Maratha movement : जरांगेंना ‘या’ नेत्यांचा प्रत्यक्षात ‘ फुल्ल सपोर्ट’ !
याशिवाय ध्वज किंवा फलकांसाठी मोठ्या काठ्या वापरणार नाहीत, कोणतेही प्राणी किंवा वाहने आंदोलनस्थळी आणले जाणार नाहीत, ध्वनिक्षेपक केवळ परवानगी दिलेल्या वेळेतच वापरण्यात येईल, पोलिसांच्या सर्व कायदेशीर सूचनांचे पालन केले जाईल, अशी अटींना जरांगेंनी सहमती दर्शवली आहे. अनुयायी नियंत्रणाबाहेर गेले, तर आयोजकांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वपरवानगी शिवाय आंदोलनास मनाई केली होती. पण सरकारने सरप्राईज देत एकदिवसीय आंदोलनास मुभा दिली आहे. आझाद मैदानात फक्त 29 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेतच आंदोलन होईल आणि फक्त पाच हजार लोकांना उपस्थित राहण्याचीच परवानगी असेल. मनोज जरांगे पाटील यांनी मात्र स्पष्ट केले आहे की, “आंदोलन कितीही मर्यादित असले तरी मराठा समाजाची भूमिका ठाम आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.” त्यामुळे आझाद मैदानावरील या ऐतिहासिक आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
______