Traffic jam; CRPF, CISF units deployed : वाहतूक कोंडी; सीआरपीएफ, सीआयएसएफ तुकड्या तैनात
Mumbai : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. हजारो आंदोलक आझाद मैदानात ठाण मांडून बसले असून, मोठी गर्दी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातही झाली आहे. या गर्दीमुळे वाहतूक ठप्प झाली असून, पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी सीआरपीएफ आणि सीआयएसएफ तुकड्या रस्त्यावर उतरवाव्या लागल्या आहेत.
आझाद मैदानात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मैदानात पाणी व चिखल साचला आहे. आंदोलकांना मिळेल तिथे आसरा घ्यावा लागतोय. रात्री उशिरा शेकडो आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशनमध्येच पथारी पसरून रात्र काढली. फोर्ट भागातील इमारतींच्या आडोशालाही आंदोलक झोपले.
शौचालयांचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी नसल्यामुळे आंदोलकांना शौचालयासाठी बिसलरीच्या बाटल्यांचा वापर करावा लागला. आंघोळीकरिता ट्रकखाली बसून पाणी ओतून स्नान करण्याची वेळ आली. जेवणासाठी हॉटेल-फूड स्टॉल बंद असल्यानेही मोठी अडचण निर्माण झाली आहे. आंदोलकांनी एकमेकांसाठी नाष्ट्याची सोय केली.
“आम्हाला जाणीवपूर्वक हाल करवून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न होतोय” असा आरोप आंदोलकांनी केला आहे. “आम्ही समुद्रात राहत असल्यासारखं वाटतंय. पावसामुळे कपडे भिजले, झोप मिळाली नाही, तरीही आम्ही मागणी मान्य होईपर्यंत मैदान सोडणार नाही” अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली आहे.
Maratha – OBC Movement : मराठा – ओबीसी आंदोलनांमुळे सरकारपुढे पेच !
आझाद मैदानाबाहेर आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने सीएसएमटी परिसरात दुतर्फा गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. पोलीस उपायुक्त स्वतः रस्त्यावर उतरले. गर्दी कमी करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सीआयएसएफ यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सरकारकडून आंदोलकांच्या सोयीसाठी कोणती पावले उचलली जाणार? आरक्षणाचा तोडगा कधी निघणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
____