Big decision of the state government, the wait for the candidates will end : राज्य सरकारचा मोठा निर्णय, उमेदवारांची प्रतीक्षा संपणार
Mumbai : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील नोकऱ्यांबाबत राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यभरातील जवळपास 9 हजार 658 अनुकंपा तत्वावरील रिक्त जागा भरल्या जाणार असून ही प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. यामुळे प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 10 हजार उमेदवारांचे स्वप्न साकार होणार आहे.
या भरती प्रक्रियेत चतुर्थ श्रेणीतीलही जागांचा समावेश असून, यापूर्वी या जागा खाजगी कंत्राटदारामार्फत भरल्या जात होत्या. मात्र, अनुकंपा तत्वावरील सर्व पदे थेट भरून काढण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने मोठ्या संख्येने कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला नोकरी देण्याची तरतूद 1973 पासून अस्तित्वात आहे. या धोरणात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. गट-क आणि गट-ड या पदांसाठी अशी सुविधा उपलब्ध आहे. मात्र, बराच काळ या नियुक्त्या रखडल्या होत्या.
सध्या राज्यात अनुकंपा तत्वावरील एकूण 9,568 उमेदवार प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी 5,228 उमेदवार महानगरपालिकांमधील, 3,705 जिल्हा परिषदांमधील तर 725 उमेदवार नगरपालिकांमधील आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 506 उमेदवार प्रतीक्षेत असून, त्यानंतर पुणे (348), गडचिरोली (322) आणि नागपूर (320) यांचा क्रमांक लागतो.
Chikhali Agriculture Office : चिखली कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या!
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळणार असून, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अनुकंपा तत्वावरील भरती होत असल्याचा मान मिळणार आहे.