Heavy Rain : शेतकरी उद्ध्वस्त, “अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नाही!”

Sharad Pawar demands immediate help to farmers : शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची शरद पवारांचा मागणी

Pune: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, परभणी आणि दक्षिण अहमदनगर या भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहेत, तर शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत सरकारला तातडीने मदतीचे निर्देश दिले आहेत.

शरद पवार म्हणाले, “जिथे पाण्याची कमतरता असते, तिथेच यावेळी अतिवृष्टी झाली आहे. याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्याच्या संसारावर झाला आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिके या पावसामुळे कुजून गेली आहेत. पाच दिवस वाफ्यात पाणी राहिल्याने उत्पादन हातात पडण्याऐवजी वाया गेले. शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. आपण दुष्काळ पाहिला, पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नाही.”

Rain alert : नवरात्रीत मुसळधार पाऊस: पुढील 24 तास महत्त्वाचे

पवारांनी स्पष्ट केले की, नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत केंद्र सरकारकडून मदतीच्या योजना उपलब्ध असतात आणि त्याची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत केली जाते. “राज्य सरकारने पंचनामे वेगाने करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी. फक्त पीक गेले म्हणून मदत करून चालणार नाही, जमिनीवरची माती वाहून गेली असेल तर त्यासाठीही मदत मिळाली पाहिजे. तसेच पाणंद रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, गुरं वाहून गेली आहेत या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे,” असे ते म्हणाले.

शरद पवारांनी पंचनाम्यांबाबतही भूमिका मांडली. त्यांनी सांगितले, “पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. वास्तव परिस्थितीची पाहणी करून पंचनामे केले तरच शेतकऱ्यांचा विश्वास बसेल. त्यानंतर तातडीची मदत आणि दीर्घकालीन उपाययोजना सरकारने केली पाहिजे.”

यावेळी हवामान खात्याचे अंदाज सुरुवातीपासून अचूक ठरत असल्याचे पवारांनी नमूद केले. “मे महिन्यात पाऊस झाला, जो सहसा होत नाही. त्यानंतर सतत हवामान विभागाने इशारे दिले, ते खरे ठरले आहेत. त्यामुळे सरकारने हवामान विभागाच्या अंदाजाचा गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

Wet drought : हिंदू नाही तर बळीराजा खतरे में…! ओला दुष्काळ जाहीर करा !

“शेतकरी राजाला पुन्हा उभे करणे ही सरकारची जबाबदारी आहे. या अभूतपूर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आणि कायमस्वरूपी मदत मिळाली पाहिजे. राज्य सरकारने या प्रश्नाचा अत्यंत गांभीर्याने विचार करावा,” अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली.