Ravikant Tupkar : ‘शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत; याला जबाबदार व्यवस्था आहे’

Farmers’ Revolution in the state within a month : रविकांत तुपकर यांची सरकारवर टीका, महिन्याभरात राज्यात शेतकरी क्रांतीची सुरुवात

Akola : ‘आज शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची लग्ने होत नाहीत, कारण शेतीतून उत्पन्न नाही. सोयाबीन आणि कापसाला भाव नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर दिवसेंदिवस खालावत आहे,’ या शब्दांत शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर टीका केली. सोयाबीनला किमान ₹६,००० आणि कापसाला ₹१०,००० प्रति क्विंटल दर मिळालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केलीय

क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे गाजीपूर (टाकळी) येथे आयोजित शेतकरी व शेतमजूर जागर सभेचे आयोजन करण्यात आले. तुपकर म्हणाले. “राज्य सरकार शेतकरी प्रश्नांबाबत अजीबात संवेदनशील नाही. अतीवृष्टीमुळे लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले, तरीही भरीव मदत जाहीर करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. जर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही, तर येणाऱ्या काळात रस्त्यावरची क्रांती सरकारला रोखता येणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “महिन्याभरात मोठं शेतकरी आंदोलन उभं राहणार आहे. आपण सर्वांनी या निर्णायक संघर्षात सहभागी व्हावे. मी अकोल्यातील सभेतही सांगितले होते की, जर असंतोष असाच वाढत राहिला तर नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. माझे फोन टॅप केले जात असले तरी मी घाबरणार नाही.”

Crime in Akola : भीषण अपघात झाल्याचा कॉल थेट उपमुख्यमंत्री शिंदेंना!

“दररोज ८ ते १० शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांच्या कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. या व्यवस्थेने शेतकऱ्यांना जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेने क्रांती घडविण्याशिवाय पर्याय नाही,” असेही तुपकर म्हणाले.