Ajit Pawars direct warning on Ghaywal case : घायवळ प्रकरणावर अजित पवारांचा थेट इशारा
Pune : पुण्यातील कोथरूड परिसरात झालेल्या गोळीबारानंतर घायवळ गँगचा म्होरक्या निलेश घायवळचे अनेक कारनामे उघडकीस आले आहेत. या प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळातही आरोप- प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात आला असल्याचा दावा होत आहे, आणि त्यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपला अधिकार वापरल्याचं आरोप करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
पुण्यात राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “मी स्वतः पोलिस आयुक्तांना सांगितलं आहे. कोण कुठल्या गटाचा, पक्षाचा, कोणाबरोबर फोटो आहेत हे बघू नका. जर तिथं चूक असेल, कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल, नियमांची पायमल्ली केली असेल, किंवा करत असेल तर त्याच्यावर थेट ॲक्शन घ्या.”
अजित पवार पुढे म्हणाले, “मला सांगितलं आहे की काही लोकांनी शिफारस केली होती, पण शस्त्र परवाना दिला नाही, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. पुण्याचा असो वा महाराष्ट्रातील, कायदा व सुव्यवस्था राखणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव न घेता काम करावं, असं मी स्पष्ट सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही तिघे एकत्र होतो, तेव्हा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या वेळीही हा विषय चर्चेत आला होता. मुख्यमंत्र्यांनी देखील हीच भूमिका घेतली आहे दोषींवर कारवाईच केली जाईल, कोणाचीही फिकीर नाही.”
OBC Reservation : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का नको, जातीय जनगणना करा!’
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निलेश घायवळसोबत संबंध असल्याचे आरोप केले. या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “कोण काय म्हणतो हा त्याचा अधिकार आहे. संविधानाने तो अधिकार दिला आहे. पण मी राज्याच्या प्रमुखांशी बोललो आहे, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. फोटो असले म्हणजे संबंध असतात असं नाही. आजच्या काळात अनेक लोक सेल्फी घेतात, त्यातून नातं निर्माण होत नाही. पण चौकशीदरम्यान फोन रेकॉर्ड्स किंवा संभाषणाचे पुरावे मिळाले, तर नक्कीच कारवाई होईल.”
ते पुढे म्हणाले, “मागच्या काळात काही चुकीच्या व्यक्तींना पक्षप्रवेश देण्यात आला होता, पण मला कळल्यावर मी त्यांना पक्षातून बाहेर काढलं. अन्याय झाला तर मी तुमच्यासाठी सर्वस्व पणाला लावेन, पण तुमचे हात बरबटले असतील तर तुम्हाला पाठीशी घालणार नाही.”
Draft Voter List Published : प्रारूप मतदार यादी जाहीर; आक्षेप नोंदविण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत
घायवळला पासपोर्ट आणि शस्त्र परवाना कोणी दिला, याची चौकशी सुरू असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. “काहींनी शिफारस केली होती, पण पोलिस आयुक्तांनी परवाना दिला नाही. शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा आहे की नाही, हे तपासायचं काम पोलिसांचं आहे. मी 32 वर्षांच्या राजकारणात शिकलो आहे मंत्री शिफारस करू शकतो, पण जर प्रतिकूल अहवाल असूनही त्यावर दबाव आणून मंजुरी मिळवली, तर तो मंत्रीच दोषी ठरतो,” असंही अजित पवार यांनी ठामपणे म्हटलं.