‘Third Front’ on the Verge of Collapse : माजी लोकप्रतिनिधीची भूमिका मोलाची, दिवाळीपूर्वीच ‘मनोमिलन’?
Akola महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काही नाराज व बंडखोर माजी नगरसेवकांनी स्वतंत्र तिसरी आघाडी निर्माण करण्याची चळवळ सुरू केली होती. मात्र, दसऱ्याच्या निमित्ताने झालेल्या राजकीय चर्चांनंतर काही माजी नगरसेवक पुन्हा भाजपात परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचा पाया निवडणुकीपूर्वीच ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डिसेंबर महिन्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सन २०१७ च्या निवडणुकीत ८० पैकी तब्बल ४८ जागांवर विजय मिळवत भाजपने मनपात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, कालांतराने काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये दुर्लक्ष झाल्याची भावना निर्माण झाली. या नाराजीचा परिणाम २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला. त्या वेळी काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत पक्षविरोधी काम केल्याने, भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसला अनपेक्षित विजय मिळाला.
या पराभवानंतर भाजपने शिस्तभंग कारवाई करून बंडखोरांना पक्षाबाहेर काढले. त्यानंतर उमेदवारीच्या संधी कमी झाल्याने नाराज गटाने तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून नवा राजकीय पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता काही माजी नगरसेवक पुन्हा भाजपात परतण्याच्या तयारीत असल्याने ही आघाडी सुरूवातीलाच विस्कटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
कधीकाळी व्यावसायिक भागीदारी असलेल्या एका माजी लोकप्रतिनिधी आणि भाजपमधील एका वरिष्ठ नेत्यामधील मतभेद अनेक वर्षांपासून सर्वश्रुत आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव घडवून आणण्यात या माजी प्रतिनिधींचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याची चर्चा होती. आता महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचालींनाही त्यांचे गुप्त पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.
Local Body Elections : पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर
विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या काही नगरसेवकांविषयी प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. मात्र, २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाने भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन पुन्हा पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत भाजपात काही महत्त्वपूर्ण पुनरागमन घडू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.