Local body election : निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात एसआयआर मोहीम पुढे ढकलावी!

State Election Commissions request to the Center : राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती

Mumbai : राज्यातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीची विशेष सुधारणा पडताळणी मोहीम (Special Intensive Revision – SIR) पुढे ढकलण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगाने या मोहिमेची अंमलबजावणी जानेवारी 2026 पर्यंत स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव पाठवला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात सर्व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार पडताळणी मोहिमेसाठी (SIR) सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. 30 सप्टेंबरपर्यंत सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान देशभरात ही मोहीम राबवण्याचे निर्देश आयोगाने दिले होते. नोव्हेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या मोहिमेला विलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.

Swabhimani Shetkari Sanghatna : तर गाठ आमच्याशी आहे, ‘स्वाभिमानी’चा सरकारला इशारा

राज्य निवडणूक आयोगाने 9 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्राद्वारे ही विनंती अधिकृतपणे केली आहे. पत्रात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असून राज्यातील सर्व निवडणूक अधिकारी निवडणुकीच्या प्रक्रियेत व्यस्त असतील. त्यामुळे SIR मोहीम राबवण्यासाठी लागणारा मनुष्यबळ आणि वेळ यावर ताण येईल. म्हणून ही प्रक्रिया जानेवारी 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती राज्य आयोगाने केली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, 31 जानेवारीपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे आणि यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे राज्य प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून निवडणूक तयारीला वेग आला आहे.

राज्याच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळत असताना राजकीय हालचालीही वाढल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागावाटप व रणनितीबाबत बैठका सुरू आहेत. काही ठिकाणी एकत्र लढायचे की स्वतंत्र, याबाबतची चर्चा रंगात आली आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांनी मतदार यादीतील घोळ, दुबार नावे, ईव्हीएम आणि मतदान नोंदणी प्रक्रियेबाबत राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली आहे.

Banana-Growing Farmers’ Protest : अंजनगाव बोर्डाला बुरहानपूरचा भाव द्या, शेतकऱ्यांचे आंदोलन

राज्य निवडणूक आयोगाची SIR मोहीम पुढे ढकलण्याची विनंती मंजूर होते की नाही, हे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून राहील. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापत चालले आहे.