Rauts response to talks of Raj-Uddhav Thackeray alliance : राज-उद्धव ठाकरे युतीच्या चर्चांवर राऊतांचे उत्तर
Mumbai: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या अनेक महिन्यांपासून एकत्र येत आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवली आहे. माध्यमांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचे लक्ष आता त्यांच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे. याच मुद्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले असून, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील,” असे स्पष्ट म्हणत त्यांनी युतीबाबत अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे.
जुलै महिन्यात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू प्रथमच एकत्र आले होते. त्यानंतर त्यांच्या मनोमिलनाची, युतीची चर्चा जोरात रंगली. कधी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले, तर कधी ठाकरे कुटुंब राज ठाकरे यांच्या गणपती दर्शनासाठी गेले. आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याच्या चर्चाही सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेट दिली, त्यावेळीही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले. मात्र अद्याप दोघांनीही युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
MLA Kardile passes away : आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन
पत्रकारांनी राऊत यांना याच संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “तुम्हाला युतीची फारच चिंता लागली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गेल्या अनेक महिन्यांपासून एकत्र काम करत आहेत, एकत्र भूमिका मांडत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात दोघे मिळून विचार करत आहेत. योग्य वेळी ते पुढील पावलं जाहीर करतील.”
मुंबईत मनसेकडून आयोजित दिवाळी दीपोत्सवाचा उद्घाटन सोहळा यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. “मनसेचा हा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू आहे. आज त्याचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मी देखील त्यासाठी उपस्थित राहणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही खोचक टीका केली. फडणवीस सध्या बिहार दौऱ्यावर असून, तेथे त्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर राऊत म्हणाले, “फडणवीस स्टार नाहीत, त्यांचा अपमान करू नका. ते सुपरस्टार प्रचारक आहेत. बाकी सगळे एक स्टार, दोन स्टार असतील, पण ते सुपरस्टार आहेत महाराष्ट्राचे. त्यामुळे त्यांना स्टार म्हणणे म्हणजे त्यांचा दर्जा कमी करणे आहे. भारतीय जनता पक्षात आता जन्मत:च स्टार निर्माण होतात,” असा टोला त्यांनी लगावला.
तसेच देशातील बनावट ओळखपत्रांच्या निर्मितीबाबतही राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “आज देशात कोणाचंही बोगस कार्ड तयार केलं जाऊ शकतं. नोटबंदीच्या वेळी नरेंद्र मोदींनी दावा केला होता की बोगस नोटा बंद होतील, पण त्यानंतरही चलनात बोगस नोटा आल्या. पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक कार्ड ही सर्व बोगस बनवली जातात. नोटबंदीमुळे दहशतवाद थांबेल, अशी घोषणा केली होती, पण काहीही बदल झाला नाही,” अशी टीका राऊतांनी केली.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे तसेच जनतेचे लक्ष लागले असून, दोन्ही नेत्यांकडून योग्य वेळी मोठा निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








