No Ticket for Those Who Merely Follow Leaders BJP Leader Chandrashekhar Bawankule’s Stern Message : विधानसभा निवडणुकीत जे वचन दिले, ते पूर्ण करणार
Nagpur : सर्वच राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या मागेपुढे फिरणारे कार्यकर्ते असतात. तसेच ते आपल्या पक्षातली असतील. पण अशा कार्यकर्त्यांमुळे पक्ष मजबूत होत नाही, तर तळागाळात जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष मोठा होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. पण नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे तिकीट दिले जाणार नाही, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट दिले जाईल, असे भाजप नेते, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले.
नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील तारसा – बाबदेव जिल्हा परिषद सर्कलमधील धामणगाव येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कलमध्ये आपल्या उमेदवारांना ५१ टक्के मते मिळतील, असा संकल्प करा. प्रत्येक घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा. विकास कामे करण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून आणा. तरच केंद्र आणि राज्य सरकारने दिलेला निधी योग्य तऱ्हेने आपल्या भागात विकास कामांवर खर्च होईल. काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले तर विकास कामांचा बट्ट्याबोळ करतील.
Sudhir Mungantiwar : उमरी पोतदार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण
भाजपला दिलेले मत किती महत्वाचे आहे, याचा प्रत्यय जनतेला येत आहे. जे वचन आम्ही विधानसभा निवडणुकीत दिले, ते पूर्ण करणार आहोत. ज्यांना घर नाही, त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे दिली जाणार आहेत. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. शेतकऱ्यांकडून मोटार पंपाचे वीज बिल घेतले जाणार नाही. सर्वसामान्य ग्राहकांची वीज दरवाढ केली जाणार नाही. शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पाळणार आहोत. त्यासाठी महसूल विभागाचा मंत्री म्हणून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.