Amit Shahs roar cannot be detected even with binoculars : दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत अमित शाहांची गर्जना
Mumbai : महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना जोशात संदेश दिला “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत अशी लढत द्या की, विरोधकांचा सुफडासाफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही ते सापडता कामा नयेत!” त्यांच्या या घोषणेनं भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.
मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात शाह यांनी महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन केलं. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, तसेच अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते”
आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतींना वंदन करून मी आज या ऐतिहासिक भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी झालो आहे. भाजपचं प्रत्येक कार्यालय हे केवळ एक इमारत नाही, तर कार्यकर्त्यांसाठी एक मंदिर आहे. इथे आमचे कार्यकर्ते प्रशिक्षण घेतात, विचार घडवतात आणि राष्ट्रहितासाठी निष्ठेने काम करतात.”
ते म्हणाले, “भाजपने नेहमी सिद्धांतांच्या आधारे धोरणं आखली आहेत. भारत आणि भारतीय जनतेच्या हितासाठी आम्ही कठोर संघर्ष केला आहे. आज महाराष्ट्र भाजप आपली परंपरा जपत नव्या पर्वाची सुरुवात करत आहे.”
अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना स्पष्ट शब्दांत सांगितलं, “आज भाजप कुणाच्या आधारावर नाही, तर स्वतःच्या बळावर उभा आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप ही मजबूत उभा राहिला आहे.”
ते पुढे म्हणाले, “ही नवी 55 हजार चौरस फुटांची इमारत पक्षाच्या वाढत्या शक्तीचं प्रतीक आहे. यात लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र कार्यालय आहे. ही इमारत दररोज मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येत्या निवडणुकीत इथूनच विजय मिळवायचा आहे!”
Sandip Joshi : देवेंद्र फडणवीसांचं ‘ते’ स्वप्नं २५ वर्षांनंतर झालं साकार !
अमित शाह म्हणाले, “भाजप हा असा पक्ष आहे जिथे एक बुथ प्रमुखसुद्धा देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. आमचा पक्ष घराणेशाहीवर नव्हे, तर कार्यकुशलतेवर चालतो. या पक्षात क्षमता असलेल्यांनाच पुढे जाण्याची संधी आहे. आम्ही सिद्ध केलं की भारतात आता घराणेशाही नव्हे, तर परफॉर्मन्सच चालतो.”
ते पुढे म्हणाले, एका गरीब चहावाल्याचा मुलगा आज तीन वेळा देशाचा पंतप्रधान झाला. हे लोकशाहीवरील आमच्या विश्वासाचं जिवंत उदाहरण आहे. ज्या पक्षांत लोकशाही पद्धतीने नेत्यांची निवड होत नाही, ते लोकशाहीचे रक्षण करूच शकत नाहीत. डिसेंबर 2026 पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचं कार्यालय उभं राहिलं पाहिजे. हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर सोपवतो.
New CJI : भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होणार न्यायमूर्ती सूर्यकांत
कार्यक्रमाच्या शेवटी शाह यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अशी मोहीम राबवावी की विरोधकांचा सुफडासाफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही ते सापडता कामा नयेत!”
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून देत सांगितलं, “त्या वेळी आम्ही स्वतंत्र लढलो आणि महाराष्ट्राला पहिला भाजपचा मुख्यमंत्री मिळाला. आता केवळ डबल इंजिन नव्हे, तर ट्रिपल इंजिन सरकारची वेळ आली आहे.” मुंबईतील या सोहळ्यात शाह यांची गर्जना आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून भाजपने आगामी स्थानिक निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं स्पष्ट झालं आहे.








