Serious Allegations Made Against District President; Later Issued an Apology : अनंता शिंदे यांचा भाजपाला ‘बाय-बाय’, शिवसेनेत प्रवेश; महायुतीत खळबळ
Buldhana भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यानेच गंभीर आरोप करत पक्षत्याग केला आणि शिवसेनेत प्रवेश घेतल्याने बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी आ. संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी (६ नोव्हेंबर) शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आ. संजय गायकवाड यांच्या ‘मातोश्री कार्यालयात’ घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनंता शिंदे यांनी विजयराज शिंदे यांच्यावर थेट आर्थिक आणि राजकीय गैरव्यवहारांचे आरोप केले. विशेष म्हणजे, अनंता शिंदे हे विजयराज शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. विजयराज शिंदे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यानेच असा आरोप केल्याने भाजपच्या जिल्हा संघटनेत खळबळ उडाली.
Local Body Elections : महायुतीत सर्वत्र आलबेल, पण बुलढाण्यात संघर्ष टोकाला!
अनंता शिंदे यांनी बैठकीत म्हटले की, “जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला. महायुतीच्या उद्दिष्टांना धक्का पोहोचवणारी भूमिका घेतली. कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण केला.”
त्यांनी पुढे सांगितले की, मागील लोकसभा निवडणुकीत विजयराज शिंदे यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विरोधातच काम केले. तसेच विधानसभा निवडणुकीतही आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात ‘अर्थपूर्ण व्यवहार’ झाल्याचा स्फोटक आरोप शिंदे यांनी केला.
या आरोपांनंतर लगेचच राजकीय वर्तुळात खळबळ माजली. यावर विजयराज शिंदे यांनी पलटवार करत एका व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “हा तर शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे. अनंता शिंदे वैफल्यग्रस्त असून त्यांचे बोलते धनी कोण आहेत हे जनतेला माहीत आहे.” तसेच, “नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दिशाभूल करणारे आरोप करून जनता गोंधळात टाकण्याचा हा डाव आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Local Body Elections : खामगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप फ्रंट फुटवर!
दरम्यान, काही तासांनंतर अनंता शिंदे यांनी दुसरा व्हिडिओ जारी करून आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली. त्यांनी भाजपातील अन्य नेत्यांचा या आरोपांशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करत आमदार श्वेता महाले यांच्यासह सर्व नेत्यांची दिलगिरी व्यक्त केली.








