Temperatures will drop further in the next 4 days : पुढील ४ दिवस तापमान आणखी घसरणार
Mumbai: राज्यात अखेर हिवाळ्याची चाहूल लागली असून, विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. परतीच्या पावसाला झालेला विलंब, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे यंदा हिवाळ्याची सुरुवात उशिरा झाली. मात्र आता हवामान विभागानं राज्यात पुढील चार दिवस किमान तापमानात मोठी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या बहुतांश भागात कडाक्याची थंडी जाणवणार असून, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील तापमान झपाट्याने घसरले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर पडत आहे. त्यामुळे नाशिक, जळगाव, गोंदिया, बीड, परभणी आणि अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. गेल्या २४ तासांत तापमान २ ते ३ अंशांनी कमी झालं असून, अनेक ठिकाणी पारा १५ अंश सेल्सियसच्या खाली गेला आहे.
Mumbai Election : मुंबई महापालिका निवडणूक आरक्षण सोडत जाहीर !
जळगाव जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून पारा ९.२ अंश सेल्सियसवर गेला आहे. गोंदियात १०.५ अंश, नाशिकमध्ये १०.७ अंश, अहमदनगरमध्ये ११.४ अंश, मालेगावमध्ये ११.२ अंश, बीडमध्ये ११.४ अंश, आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये १२.४ अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे. परभणी आणि सातारा येथे १३.५ अंश, धाराशिव आणि उदगीर येथे १४ अंश, तर सोलापूर आणि सांगलीत अनुक्रमे १६.४ आणि १५.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईसह कोकणातील तापमान तुलनेने थोडं जास्त आहे. मुंबईत सांताक्रूझ येथे १९.८ अंश तर दहानू येथे १७.४ अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे. मात्र सकाळी आणि रात्री गारठ्याची चाहूल मुंबईतही जाणवू लागली आहे.
Delhi blast case : ‘षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार…’
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढत आहे. पुढील चार दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या अंदाजानुसार, या काळात राज्यातील बहुतांश भागात किमान तापमान ९ ते १४ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहू शकतं.
हिमालयात सुरू असलेली बर्फवृष्टी आणि थंड वाऱ्यांची झुळूक या दोन्हींचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर दिसत आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या भागातही थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना पुढील काही दिवस सकाळ-संध्याकाळ अधिक गारठ्याचा अनुभव येणार आहे.
हिवाळा उशिरा सुरू झाला असला तरी डिसेंबरपूर्वीच तापमानात मोठी घसरण दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गालाही याचा परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आणि सकाळच्या वेळेत प्रवास करताना आवश्यक ती ऊब राखण्याचं आवाहन केलं आहे.
_____








