₹208 Crore Sanctioned for Runway Expansion : धावपट्टी विस्तारासाठी २०८ कोटींची मंजुरी, पश्चिम विदर्भातील दुसरे विमानतळ ठरणार
Akola अनेक वर्षांपासून कागदोपत्री अडकलेल्या अकोल्यातील शिवणी विमानतळ विस्तार प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत धावपट्टी विस्तारासाठी २०८.७६ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. हा निर्णय राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेषाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अमरावती येथील विमानतळ सुरू झाल्यानंतर अकोल्यासंदर्भात निर्णय झाल्याने पश्चिम विदर्भातील हे दुसरे विमानतळ ठरणार आहे.
शिवणी विमानतळाची सध्याची धावपट्टी १,४०० मीटर आहे. वाणिज्यिक उड्डाणांसाठी किमान १,८०० मीटर धावपट्टी आवश्यक असल्याने येथून विमानसेवा सुरू होऊ शकलेली नव्हती. प्रस्तावित योजनेनुसार २२.२४ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार असून, त्यामुळे धावपट्टीची लांबी १,८०० मीटरपर्यंत वाढविली जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाचा विस्तार फक्त फाइलपुरता मर्यादित राहिला होता. जिल्हा प्रशासनाने चार वेळा विस्ताराचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले; मात्र महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी व विमानतळ प्राधिकरणाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती.
२०२४-२५ च्या राज्य अर्थसंकल्पात अकोला विमानतळासाठी निधी न मिळाल्याने हा प्रकल्प सरकारच्या प्राधान्य यादीत मागे पडला होता.
दरम्यान, अमरावतीतील बेलोरा विमानतळाचा विकास जलदगतीने पूर्ण होऊन तेथून ३१ मार्च २०२५ पासून नियमित उड्डाणे सुरू झाली आहेत. त्यामुळे अकोल्यातील नागरिकांमध्ये नाराजी होती.
आता विशेषाधिकार समितीच्या या निर्णयामुळे शिवणी विमानतळाचा विस्तार मार्गी लागण्याची शक्यता वाढली असून, अकोल्यातून हवाई प्रवासाचे स्वप्न साकार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Mumbai Election : मुंबई महापालिका निवडणूक आरक्षण सोडत जाहीर !
अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील उद्योगांना चालना मिळावी, विदर्भाची पंढरी शेगावला येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळाव्यात आणि परिसराचा पर्यटन विकास व्हावा, या उद्देशाने विमानतळ कार्यान्वित व्हावे, अशी मागणी त्यांनी कायम ठेवली होती.








