Opposition alleges that Ajit Dada is being pressured through Parth case : विरोधकांचा आरोप, पार्थ प्रकरणातून अजित दादांवर दबावाचा डाव
Mumbai : पार्थ पवार प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर तीव्र टीका केली आहे. “भाजपाची मोडस ओपरेंडीच गुन्हेगारी स्वरूपाची आहे. संबंधित प्रकरणे बाहेर काढून दबाव निर्माण करायचा, आणि शेवटी आपल्या अटी मान्य करून घ्यायच्या हा त्यांचा पद्धतशीर डाव आहे,” असे दानवे यांनी म्हटले.
पुण्यातील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहाराबाबत भाजपाला आधीच माहिती होती, असा दावा करत दानवे म्हणाले की, “हे प्रकरण मुद्दाम बाहेर काढण्यात आले, जेणेकरून अजित पवार अडचणीत यावेत. हीच भाजपाची मोडस ओपरेंडी आहे. आता अजित दादांची फाईल तयार आहे. उद्या त्यांनी सरकारविरोधात पाऊल उचललं, तर एक मिनिटात पार्थ पवारांना अटक होईल. हे सर्व भाजपाचे नियोजित षडयंत्र आहे.”
Local Body Elections : भाजपला रोखण्यासाठी शरद पवार गटाची जोरदार तयारी !
अंबादास दानवे यांनी पुढे सांगितले की, “भाजपानेच हे प्रकरण बाहेर आणायचे ठरवले, आणि संबंधितांनी आपले ऐकले पाहिजे अशा हेतूने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा राजकीय वापर होत आहे. एकीकडे महार वतनाची जमीन विकली जाते, कंपनीचा संचालक म्हणून पार्थ पवारांवर कारवाई होत नाही, आणि दुसरीकडे व्यवहार रद्द झाल्याचं सांगत मुद्रांक शुल्क माफ केलं जातं. हे नेमकं कोणत्या कायद्यानुसार चाललं आहे?”
दानवे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका करताना म्हटलं की, “व्यवहार रद्द झाला सांगताना ४२ कोटींची नोटीस देणं म्हणजे स्वतःच्या निर्णयावर अविश्वास दाखवणं आहे. बावनकुळे यांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे. भाजप पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभेचे उमेदवार असलेले पार्थ पवार हे बालक नाहीत; कायद्यापुढे सर्व समान आहेत. मग त्यांच्याविरोधात कारवाई का होत नाही?”
यावेळी त्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या बैठकीबाबत मोठा दावा केला. “त्या बैठकीत अजित पवार अतिशय संतप्त झाले होते. त्यांनी सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देण्याचीही भाषा केली होती. या बैठकीनंतरच परिस्थिती बदलली आणि पार्थ पवारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले,” असा दावा दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला.
Peoples republican party : ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती फक्त शिंदे गटासोबतच
शरद पवार यांनीही या प्रकरणावर भाष्य करत सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली होती. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्थ पवारांना वाचवू शकत नाहीत. त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी लागेल,” असं वक्तव्य त्यांनी केल्याचं दानवे यांनी स्मरण करून दिलं.
या सर्व घडामोडींमुळे पार्थ पवार प्रकरण आता फक्त कायदेशीर न राहता राजकीय वादळ ठरलं आहे. ठाकरे गटाने केलेल्या या आरोपांनंतर राज्यातील सत्तासमीकरणांवर याचा पुढील परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
_______








