Local Body Elections : सिंदखेडराजात तिरंगी लढत, युती-आघाडी आजमावणार नशीब!

Triangular Contest in Sindkhedraja Municipal Council Election : शिंदे गटाची स्वतंत्र लढाई, उमेदवाराच्या शोधासाठी राजकीय पक्षांची धावपळ

Sindkhedraja : नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या २ डिसेंबरला होत असून, संपूर्ण शहराचे लक्ष या “मिनी विधानसभा” मानल्या जाणाऱ्या निवडणुकीकडे लागले आहे. प्रारंभीच्या राजकीय हालचालींवरून महाविकास आघाडी (मविआ), महायुती (भाजप–राष्ट्रवादी अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तिरंगी लढतीचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.

महाविकास आघाडीकडून प्रचाराचे नेतृत्व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हाती घेतले असून, गेल्या काही दिवसांपासून ते शहरात तळ ठोकून प्रत्येक प्रभागातील उमेदवारांच्या विजयासाठी सक्रिय आहेत. या आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा सरचिटणीस विजय तायडे यांचे पुत्र सौरभ तायडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तरुण, ऊर्जावान आणि विकासाभिमुख चेहरा म्हणून सौरभ तायडे यांना स्थानिक स्तरावर चांगला पाठिंबा मिळू लागला आहे.

Local Body Election : नागपूर जिल्ह्यातील हॉट नगर परिषदेमध्ये पुन्हा दोन दिग्गज आमने-सामने !

शिवसेना (शिंदे गट) कडून केंद्रीय मंत्री खा. प्रतापराव जाधव व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते उत्साहात मैदानात उतरले आहेत. आतिश तायडे हे पक्षाचे प्रमुख उमेदवार असून, त्यांनी गेल्या काही दिवसांत प्रभागनिहाय जनसंपर्क मोहिमेला वेग दिला आहे.

भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या आघाडीने तयारी सुरू केली असून, श्यामभाऊ मेहेत्रे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मेहेत्रे यांना आ. मनोज कायंदे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, तसेच माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे यांचे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा खेळ अधिक बळकट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सिंदखेडराजा नगर परिषद क्षेत्रात एकूण १० प्रभागांतून २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगराध्यक्षपदाचा निर्णय नगरसेवकांच्या संख्येवर अवलंबून असल्याने, प्रत्येक पक्षासाठी उमेदवारांची निवड मोठे आव्हान ठरत आहे. प्रत्येक प्रभागातील जातीय आणि स्थानिक समीकरणे, तसेच पक्षीय निष्ठा यांचा ताळमेळ साधताना नेत्यांना चांगलाच डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.

Local Body Elections : ‘मतचोरी’चा स्फोटक मुद्दा महाविकास आघाडीला फायदा करून देणार ?

तिरंगी लढतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात तीन-तीन उमेदवारांची गरज असल्याने, सर्वच पक्षांनी “गनिमी कावा” वापरून इतर पक्षांतून मजबूत चेहरे खेचण्याची मोहीम सुरू केली आहे. काही प्रभागांमध्ये अद्याप योग्य उमेदवार न सापडल्याने पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.