Former MLA urges the government to hold the voting right at the BJP office : बच्चू कडू यांचा दावा, भाजप कार्यालयातच मतदान ठेवण्याचे आवाहन
Amravati बिहार विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी बजावलेली भूमिका आणि तेथील राजकीय वातावरण पाहता, इतक्या मोठ्या फरकाने एनडीएचे सरकार येईल अशी परिस्थिती नव्हती. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामुळे हा लोकमताचा कौल नसून मशीनची कामगिरी असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे, अशी टीका माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली. असे सुरू राहिले तर लोकशाही धोक्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
कडू म्हणाले की, सत्ताधारी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. “अचलपूर विधानसभेत संपूर्ण वातावरण आमच्या बाजूने असताना निकाल मात्र दुसऱ्याच्या बाजूने लागला. हेच चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. भाजपला आता प्रादेशिक पक्षांची गरज उरलेली नाही. महाराष्ट्रातही त्यांना अजित पवार वा एकनाथ शिंदे यांच्या पक्षांची आवश्यकता राहिलेली नाही. पुढील काळात भाजप एकट्याने राज्यात कसे पुढे जाईल, याची तयारी सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
Bihar Elections : १० हजार रुपये खात्यात अन् महिलांनीच हाती घेतली निवडणूक, शरद पवारांचा तिखट आरोप !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मशीन निर्णायक ठरणार असल्याचा आरोप करत कडू म्हणाले, “मतदारांचा निर्णय या प्रक्रियेत उरलेलाच नाही. आता नगरपालिकांना व्हीव्हीपॅट दिसणार नाही. मग मतदान केंद्रावर मतदान ठेवण्यापेक्षा ते भाजपच्या कार्यालयातच ठेवावे,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
कडू म्हणाले की, निवडणुकीच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करायला हवा होता. “सत्तेचा वापर करून पैशातून निवडणुका लढवणे चुकीचे आहे. केवळ ‘लाडक्या बहिणी’मुळे हा निकाल लागलेला नाही, हा सर्व मशीनचा चमत्कार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आली तर निकालांचे चित्र पूर्ण बदलून दिसेल,” असे ते म्हणाले.
कडू म्हणाले, “ईव्हीएम काँग्रेसने आणले तेव्हा भाजप त्यावर टीका करत होता आणि आता भाजप सत्तेत आल्यानंतर काँग्रेस त्यावर बोलत आहे. म्हणजे दोनही पक्षांकडून लोकशाहीची थट्टा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पूर्वी ईव्हीएमला विरोध केला होता. त्यांचे जुने भाषण पाहिले तर त्यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते दिसून येईल. सुरुवात काँग्रेसने केली असली तरी लोकशाही संपवण्याचा विडा भाजपने उचलला आहे.”








