Shiv Sena accelerates candidate selection process for municipal elections : धंतोलीत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; संघटन बळकटी, बूथस्तर तयारी आणि प्रचार आराखड्यावर सविस्तर चर्चा
Nagpur : आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, वैद्यकीय मदत कक्ष आणि वाहतूक संघटना यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण रणनीती बैठक धंतोली येथील पूर्व विदर्भ शिवसेना कार्यालयात पार पडली. या बैठकीचे आयोजन महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य कृपाल तुमाने आणि पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
बैठकीच्या संचालनाची जबाबदारी शिवसेना नागपूर लोकसभा जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांनी सांभाळली. बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीच्या तयारीचा विस्तृत आढावा घेतला गेला. यात इच्छूक उमेदवारांची प्राथमिक माहिती, उमेदवारी अर्ज प्रक्रिया, प्रभागनिहाय संघटनात्मक मजबुती, तसेच निवडणुकीसाठी आवश्यक रणनीती या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. स्थानिक पातळीवर पक्षाचे नेटवर्क अधिक बळकट करण्यासाठी विभागनिहाय नियोजनावर विशेष भर देण्यात आला.
Local Body Election : नागपूर जिल्ह्यात निवडणुकीचा ज्वर चढला; प्रमुख राजकीय पक्षांचा स्वबळाचा नारा !
आमदार कृपाल तुमाने यांनी उमेदवार निवड प्रक्रियेबाबत महत्त्वाचे दिशानिर्देश दिले. ते म्हणाले की, उमेदवाराचा जनाधार, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद, सामाजिक बांधिलकी, तसेच संघटनेशी निष्ठा, या सर्व बाबींना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. नागपूर मनपा निवडणूक ही शहराच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांनी पदाधिकाऱ्यांना सुयोग्य नियोजन, टीमवर्क, तसेच बूथस्तरावरील संघटन बळकटीकरण या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येक प्रभागात काटेकोर समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
Sanjay Raut Health Update: दुर्धर आजारावर मात करत संजय राऊत घराबाहेर
जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांनी इच्छूक उमेदवारांना संघटनप्रणीत प्रचार पद्धती, घरपोच जनसंपर्क मोहीम, आणि नागरिकांशी थेट संवाद सशक्त करण्याबाबत सूचना दिल्या. प्रचार मोहीम आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक संपर्क यांचे संयोजन राहील, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत गुलामभाई पोठीयावाला, अमित कातुरे, मनिषा पापडकर, अनिता जाधव, निलेश तिघरे, समीर शिंदे, धिरज फंदी, नरेश मोहाडीकर, गणेश डोईफोडे, विकास अंभोरे यांसह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
ही रणनीती बैठक निवडणूक तयारीचा पाया मजबूत करणारी ठरली. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज प्रक्रिया आणि प्रभागनिहाय संघटनात्मक पुनर्रचना आणखी गतीमान होणार असल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.








