Local Body Elections : उमेदवारांची ‘विकासपत्रिका’ अनिवार्य; मुद्दा 15-ब न भरल्यास उमेदवारी धोक्यात!

It is mandatory to mention in the nomination form which development works are going to be carried out : कामांचा लेखाजोखा दिल्याशिवाय अर्ज पूर्ण होणार नाही, आयोगाचा नियम

Buldhana आगामी नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना यंदा केवळ अर्ज भरणे पुरेसे राहणार नाही, तर आपल्या प्रभागासाठी नेमकी कोणती विकासकामे करणार आहेत, याची ‘विकासपत्रिका’च अर्जात नमूद करावी लागणार आहे. उमेदवारी अर्जातील मुद्दा क्रमांक 15-ब हा यासाठी अनिवार्य ठेवण्यात आला असून, तो न भरल्यास उमेदवारी अर्ज थेट बाद होऊ शकतो, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी दिला.

यंदाच्या निवडणुकीत मुद्दा 15-ब हा सर्वाधिक चर्चेत येत आहे. कारण, अनेक इच्छुक उमेदवारांना आपल्या प्रभागासाठी कोणती कामे सुचवायची, ती कशी मांडायची याबाबत स्पष्टता नसल्याचे चित्र जिल्हाभर दिसते. अनेक ठिकाणी उमेदवार इतरांकडून मसुदा तयार करून घेताना दिसत आहेत.

Local Body Elections : नगरपालिका कार्यालयांत झुंबड, उमेदवारांमधील संभ्रम कायम

निवडून आल्यानंतर कोणती कामे करणार? रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, उद्याने, कचरा व्यवस्थापन, डिजिटल सुविधा, आरोग्य सेवा, महिला सुरक्षेसंबंधी उपक्रम… असे स्पष्ट आणि तपशीलवार विकास आराखडे उमेदवारांनी लेखी स्वरूपात देणे बंधनकारक आहे. ही माहिती अपूर्ण राहिल्यास अर्जाची वैधताच धोक्यात येते.

शरद पाटील म्हणाले, “मुद्दा क्रमांक 15-ब हा फक्त औपचारिकता नाही. उमेदवारी अर्जाचा हा मुख्य आधार असून, तो न भरल्यास अर्ज बाद करण्याचा अधिकार आयोगाला आहे.”

Local Body Elections : लोणारच्या कर्मचाऱ्यांना ‘फुल सर्व्हिस’, मेहकरचे मात्र उपाशीपोटी!

राजकीयदृष्ट्या हा बदल महत्वाचा मानला जात आहे. कारण आजवर निवडणुकांत दिलेली बहुतेक आश्वासने कागदावर कुठेही नमूद नसल्याने नागरिकांना त्याची पूर्तता मागणे कठीण जात होते. मात्र आता अर्जातील ही माहिती सार्वजनिक झाल्यानंतर नागरिक थेट उमेदवारांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करू शकणार आहेत. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांवर कामे पूर्ण करण्याची जबाबदारी अधिक स्पष्टपणे राहणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या राजकीय वातावरणात हा मुद्दा उमेदवारांसाठी ‘अडथळा’ की ‘संधी’? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.