No gap in mahayuti, Chief Ministers firm stand on discussions of displeasure : महायुतीत दुरावा नाही, नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका !
Mumbai : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असताना महायुतीतील अंतर्गत कुरघोडी, फोडाफोड आणि नाराजी यावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील संबंध बिघडत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार सुरू होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आपल्या नेत्यांवर होत असलेल्या फोडाफोडीची तक्रार केल्यानंतर या चर्चांना आणखी जोर मिळाला.
यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही दुरावा निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता स्वतः फडणवीस यांनी यावर मोठी स्पष्टता देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
गेल्या काही कार्यक्रमांमध्ये दोन्ही नेत्यांमधील देहबोली, एकमेकांना टाळण्याची शैली, आणि केवळ औपचारिक अभिवादन यामुळे महायुतीतील नात्यात तणाव असल्याच्या बातम्या सातत्याने झळकत होत्या. बिहारमधील शपथविधी सोहळ्यात तर दोन्ही नेत्यांच्या वर्तणुकीवरून त्यांच्यातील नाराजी चव्हाट्यावर आली, अशी चर्चा पसरली होती. मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळील कार्यक्रमात झालेल्या अल्प आणि औपचारिक भेटीनंतर तर हे तणावाचे चित्र अधिक गडद दिसू लागले.
Rane Vs Chavan : अती होतंय… आम्ही सहन करतोय ते राणे साहेबांसाठीच, बाकी कुणासाठी नाही !
मात्र या सगळ्या चर्चांचा फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. माध्यमांमधील या चर्चांवर ते म्हणाले “हा वेड्यांचा बाजार सुरु आहे. काही माध्यमं तर अगदी वेडी झाली आहेत. हुतात्मा स्मारकावर गेलो तेव्हा आम्ही दोघेही भेटलो, एकमेकांना कुठे जातोय तेही सांगितलं. ते फोटो किंवा व्हिडिओमध्ये दाखवलं नाही म्हणून आम्ही बोललो नाही, अशी हवा केली गेली. कालच्या कार्यक्रमातही आमच्या जागा आधीपासून ठरलेल्या होत्या. तरीही आम्ही स्टेजवर आणि निघताना भेटलो. न बोलण्यासारखं काहीही घडलं नाही. तुम्ही दाखवताय तशी परिस्थिती अजिबात नाही. जे लोक असं दाखवतात, ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत.”
Maharashtra politics : ‘भाजपा मित्रपक्षांना गिळंकृत करतो, आता वेळ शिंदेच्या शिवसेनेची’
अशा शब्दांत फडणवीस यांनी महायुतीतील दुराव्याच्या बातम्या फेटाळून लावत सध्याच्या राजकीय वातावरणात मोठा संदेश दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या अफवा जोर धरत होत्या, त्या काही अंशी शांत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आता महायुतीतील पुढील राजकीय हालचाली आणि उमेदवारी वाटपात हे समीकरण कसे दिसते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








