व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Malkapur APMC : ‘आठ महिन्यांचा फॉर्म्युला’ दीड वर्ष ओलांडला; सभापतीपदावरून कुजबूज

Malkapur APMC : ‘आठ महिन्यांचा फॉर्म्युला’ दीड वर्ष ओलांडला; सभापतीपदावरून कुजबूज

‘Eight-Month Formula’ Crosses One and a Half Years; Buzz Grows Over APMC Chairperson’s Post : कृषी उत्पन्न बाजार समितीवरून भाजपमध्येच प्रतीक्षेचे राजकारण? इच्छुक संचालकांची वाढली अस्वस्थता

Malkapur मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबास) सभापतीपदाच्या बदलाबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. तत्कालीन सभापतींविरुद्ध अविश्वास ठरावानंतर झालेल्या अंतर्गत बैठकीत तत्कालीन चर्चेनुसार सभापतीपदाचा कार्यकाळ केवळ आठ महिन्यांचा राहील, अशी मौखिक सहमती झाल्याची चर्चा त्यावेळी होती. मात्र प्रत्यक्षात दीड वर्षाचा कालावधी उलटूनही नेतृत्वात बदल न झाल्याने इच्छुक संचालकांमध्ये नाराजीची कुजबूज सुरू असल्याचे बोलले जात आहे.

जून २०२३ मध्ये भाजपचे नेते शिवचंद्र तायडे हे बाजार समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले होते. त्यानंतर संचालक मंडळाशी मतभेद वाढल्याने ३१ मे २०२४ रोजी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पद सोडावे लागले आणि नवीन सभापती कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Sanjay Savkare : सावकारे आले… पण आता जिल्ह्यात नियमित दिसणार का?; सहपालकमंत्र्यांच्या भूमिकेवर पुन्हा चर्चा

त्यावेळी विविध इच्छुकांची नावे चर्चेत असताना अंतिम निर्णय आमदार चैनसुख संचेती यांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे बोलले जात होते. माजी सभापती साहेबराव पाटील, ज्ञानदेव वाघोदे, नंदाताई पाटील आणि भगवान चोपडे यांची नावे चर्चेत असतानाच संजय काजळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा होती की, अंतर्गत बैठकीत संजय काजळे यांनी “मला आधी संधी द्या, मी केवळ आठ महिने सभापती राहीन,” अशी भूमिका मांडली होती. या चर्चेला त्या वेळी काही संचालकांनीही दुजोरा दिल्याचे सांगितले जात होते. मात्र या दाव्याची अधिकृत नोंद अथवा सार्वजनिक पुष्टी झालेली नाही.

७ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या विशेष बैठकीत संजय काजळे यांची एकमताने सभापतीपदी निवड झाली. तथापि, कथित आठ महिन्यांचा कालावधी संपूनही ते अद्याप सभापतीपदावर कायम असल्याने इच्छुक संचालकांमध्ये अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे “पुढील बदल कधी?” हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या नगरसेवकाचे मनपासमोर बेमुदत उपोषण; दहा मागण्यांवर ठाम भूमिका

राजकीय जाणकारांच्या मते, बाजार समितीतील नेतृत्वबदलाचा निर्णय केवळ प्रशासकीय नसून स्थानिक राजकीय समीकरणांशीही जोडलेला आहे. त्यामुळे सभापतीपदाचा निर्णय केव्हा आणि कोणाच्या बाजूने होतो, यावर पुढील राजकीय घडामोडींची दिशा ठरू शकते.
दरम्यान, आठ महिन्यांच्या कथित फॉर्म्युल्याबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून, नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू झाल्यानंतरच त्या चर्चेतील तथ्य समोर येईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

error: Content is protected !!